मुंबई : महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आता कठोर भुमिका घेतली आहे. राऊत यांनी आता अशा अधिकाऱ्यांविरोधात चांगलाच बडगा उगारला आहे. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांना राऊत यांनी निलंबित केलं आहे. या अधिकाऱ्याला निलंबित करून चौकशी करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसंच राऊत यांनी यांनी अधिकाऱ्यांनाही कठोर संदेश दिले आहेत.
दरम्यान, निलंबित केलेल्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. महावितरणमधील मीटर रीडिंग एजन्सी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या पैशांची मागणी करणे, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना धमकावणं असे आरोप संबंधीत अधिकाऱ्यावर आहेत. दरम्यान, या धमकीची रेकॉर्डिंग क्लिप देखील उपलब्ध आहे. मात्र, क्लिप उपलब्ध असूनही ठोस कारवाई होत नव्हती. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत करून मुख्य तपास अधिकारी पद मिळवण्याचं काम हा अधिकारी करत होता.