Wednesday, January 15, 2025
Homeमहत्वाची बातमीराऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे

राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे

दिल्लीच्या पथकाकडून ठाणे, रायगडमध्ये सर्च ऑपरेशन

मुंबई : खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी असलेले प्रवीण राऊत यांच्या रायगडमधील १ हजार कोटीच्या बेनामी मालमत्तेबाबत माहिती समोर येताच, दिल्लीतील सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाकडून ठाणे, रायगडमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये प्रवीण राऊत यांच्या दोन जवळच्या व्यक्तींच्या मालमत्तांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत.

गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपात मनी लॉड्रिंगचा दाखल गुन्ह्यात ईडीने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राऊत यांच्यावर अटकेची कारवाई केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. चौकशीत राऊत यांनी अनेक ठिकाणी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती ईडीला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी दिल्ली ईडीचे २५ ते ३० अधिकारी, कर्मचारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्याकडून ठाणे, रायगडमध्ये छापे टाकण्यात आले. राऊत त्यांच्या २ निकटवर्तीयांच्या संबंधित मालमत्तांवर कारवाई सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यांच्या मार्फत त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी १ हजार कोटीची बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे. पीएसीएल नावाच्या कंपनीने २०१५ मध्ये भारतात पॉन्झी स्कीम राबवून ५ कोटी गुंतवणूकदारांचे पैसे बुडवून कंपनी बंद झाली. सेबीने कंपनीवर कारवाई केल्यानंतर या ग्रुपकडून आलेल्या १ हजार कोटीच्या काळा पैशातून रायगडमध्ये जागा घेतली. प्रवीण राऊतच्या चौकशीतून ईडीला या बेनामी मालमत्तेबाबत माहिती मिळाली. याच जागेसंदर्भात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामागे संजय राऊत यांचाही काही सहभाग आहे का? याच्या चौकशीसाठी ईडीचे अधिकारी तपास करीत आहेत.

याआधी १ जानेवारी २०२१ रोजी ईडीने प्रवीण राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावत चौकशी केली होती. या चौकशीनंतर ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली होती. तसेच ईडीने प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची संपत्ती जप्त केली. तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांनाही गेल्या वर्षी समन्स बजावले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -