क्वीन्सटाउन (वृत्तसंस्था): मधल्या फळीतील रिचा घोष हिच्या झटपट अर्धशतकानंतरही भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडेत ६३ धावांनी पराभव पाहावा लागला. यजमानांच्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्यांचा डाव १७.५ षटकांत १२८ धावांवर आटोपला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा खेळवण्यात आला.
रिचा घोष हिची (२९ चेंडूंत ५२ धावा) फटकेबाजी वगळता भारताचा डाव निरस ठरला. ४ चौकार आणि तितकेच षटकारांनी तिची झटपट खेळी साकारली. रिचा हिला केवळ कर्णधार मिताली राजची (२८ चेंडूंत ३० धावा) चांगली साथ लाभली. या दोघींच्या पाचव्या विकेटसाठीच्या ७७ धावांच्या भागीदारीने भारताला विजयाच्या आशा दाखवल्या. मात्र, रिचा आणि मिताली बाद झाल्यानंतर पाहुण्यांचा पराभव केवळ उपचार ठरला. भारताच्या शेवटच्या पाच विकेट केवळ ३२ धावांमध्ये पडल्या.
यजमानांची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर शफाली वर्मा आणि वनडाऊन यास्तिका भाटिया खातेही उघडू शकल्या नाहीत. चौथ्या क्रमांकावरील पूजा वस्त्रकार (४ धावा) आणि सावधपणे खेळणारी अनुभवी ओपनर स्मृती मन्धाना सुद्धा (१३ धावा) माघारी परतल्याने पाहुण्यांची अवस्था पाचव्या षटकांत ४ बाद १९ धावा अशी झाली. हेली जेन्सन आणि अमेलिया केरने प्रत्येकी तीन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १९१ धावांची मजल मारली. त्याचे क्रेडिट आघाडी फळीला जाते. अमेलिया केर हिची (३३ चेंडूंत नाबाद ६८ धावा) फटकेबाजी तसेच सुझी बेट्स (२४ चेंडूंत ३२ धावा), कर्णधार सोफी डिव्हाइन (२४ चेंडूंत ३२ धावा) आणि अॅमी सॅथरवेट (१६ चेंडूंत ३२ धावा) यांच्या उपयुक्त खेळीमुळे यजमानांनी दोनशेच्या घरात झेप घेतली. कर्णधार सोफीने बेट्ससह ६ षटकांत ५३ धावांची झटपट सलामी दिली. त्यानंतर केर हिच्यासह दुसऱ्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. सॅथरवेट आणि केर यांची तिसऱ्या विकेटसाठीची ४८ धावांची भागीदारी न्यूझीलंडच्या डावातील दुसरी सर्वात मोठी पार्टनरशिप ठरली. केर हिने मॅककायसह जोडलेल्या ३२ धावा सुद्धा किवींसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. भारताने २० षटकांसाठी सहा बॉलर्सचा वापर केला. त्यात रेणुका घोष (३३ धावांत २ विकेट) सर्वात यशस्वी ठरली. मेघना सिंग, राजेश्वरी सिंग आणि दीप्ती वर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.
न्यूझीलंड दौऱ्यातील भारताचा हा सलग पाचवा पराभव आहे. मंगळवारच्या पराभवामुळे पाहुण्यांची वनडे मालिकेतील पिछाडी ०-४वर गेली आहे.