Friday, May 9, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीरायगड

कोर्लाईच्या सरपंचांनीच केला ‘त्या’ १९ बंगल्यांचा खुलासा!

कोर्लाईच्या सरपंचांनीच केला ‘त्या’ १९ बंगल्यांचा खुलासा!

अलिबाग : कोर्लाई गावातल्या ‘त्या’ १९ बंगल्यांवरून सध्या राज्यातले राजकारण तापले असून त्यासंदर्भात खुद्द कोर्लाई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी खुलासा केला आहे. संबंधित वादग्रस्त जमीन ही मूळ ख्रिश्चन समाजाची असून त्यांच्याकडून अन्वय नाईक यांनी ती विकत घेतल्याचे सरपंच मिसाळ म्हणाले. “२००९ला ती जमीन अन्वय नाईक यांनी विकत घेतली होती. २०१४ला त्यांनी ती वायकर आणि ठाकरे यांच्या नावावर केली. अन्वय नाईक यांनी जमीन विकली तेव्हा तिथे कुठलीच घरं नव्हती मात्र मागच्या वर्षीपर्यंत ती कागदोपत्री दाखवण्यात आली होती व त्याचा करही भरलेला आहे”, असे स्पष्टीकरण मिसाळ यांनी दिले आहे.


सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादग्रस्त जमिनीवर १९ नव्हे तर प्रत्यक्षात १८च घरं होती. “२००९ला अन्वय नाईक यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून ही घरं घेतली होती. त्यांना रिसॉर्ट तयार करायचं होतं. त्यानंतर सीआरझेडची परवानगी न मिळाल्यामुळे त्यांनी तो प्लॅन रद्द केला. त्यानंतर त्यांनी त्या जागेची लेव्हलिंग करून तिथे झाडं लावली.”


अन्वय नाईक यांनी ही घरं पाडल्यानंतर देखील २०१४ पर्यंत तिथल्या १८ घरांची घरपट्टी चालू स्थितीतच राहिली. २०१४ पर्यंत अन्वय नाईक यांनी घरपट्टी भरली आहे. २०१४ला मनीषा वायकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी ती जागा विकत घेतली. मात्र, २०१९ला अर्ज करून त्यांनी संबंधित जागेची मालकी त्या दोघींच्या नावावर केली. आजच्या स्थितीत २०२१मध्ये तिथे एकही घर नसल्यामुळे आम्ही ती घरं कागदोपत्री रद्द केली आहेत”, असं मिसाळ म्हणाले.


रश्मी उद्धव ठाकरेंचा कोणताही माफीनामा आजपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध झालेला नसल्याचं सरपंचांनी स्पष्ट केलं. “ठाकरे कुटुंबापैकी कुणीही आजपर्यंत आमच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी कधीही ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केलेला नाही. जे काही आहे, ते आम्ही रीतसर केलं आहे. २०२१पर्यंत रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी घरपट्टी भरलेली आहे. हा व्यवहार झाला, तेव्हा ही घरं प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हती. फक्त कागदावर होती. साधारण ३ ते साडेतीन हजार चौरस फुटांची घरपट्टी होती. आम्ही त्यांना त्यासंदर्भात पत्र लिहिली होती. त्यानंतर त्यांनी घरपट्टी भरली. मात्र नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथे घरं अस्तित्वात नाहीत. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून घरपट्टी रद्द केली”, असं मिसाळ म्हणाले.

Comments
Add Comment