Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखहमारा बजाज, उद्योजकांचा दीपस्तंभ

हमारा बजाज, उद्योजकांचा दीपस्तंभ

वाहन निर्मिती उद्योग क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने केवळ उद्योग जगतातच नव्हे, तर सर्व देशभर मध्यमवर्गीय व सामान्य जनतेतही हळहळ व्यक्त झाली. हमारा बजाज ही त्यांची आणि बजाज अॉटोमोबाइल्स उद्योगाची ओळख देशभर घराघरांत आहे. बजाज यांच्या निधनाने आपला कोणी निकटवर्तीय गेला, अशीच भावना जनतेत प्रकट झाली. बजाज स्कूटर या दुचाकीच्या माध्यमातून बजाज उद्योगसमुहाचे नाव देशातील कोट्यवधी कुटुंबीयांशी जोडले गेले. बजाज स्कूटरमुळे दुचाकी क्षेत्रात राहुल बजाज यांनी क्रांती घडवली. कमी खर्चात, कमी वेळेत मध्यमवर्गीय माणूस आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचू शकतो, याचे श्रेय राहुल बजाज व त्यांच्या उद्योगसमुहालाच दिले पाहिजे.

यशस्वी उद्योजक, पण त्याचबरोबर समाजसेवेचे भान असलेला देशभक्त, असे राहुल यांचे वर्णन करावे लागेल. उद्योग क्षेत्रात असंख्य उद्योजकांचे प्रेरणास्थान आणि हजारो कर्मचारी व कामगारांचा आधार, असे राहुल बजाज होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचीच नव्हे, तर समाजाचीही फार मोठी हानी झाली आहे. राहुल यांचा जन्म कलकत्ता येथील. प्रसिद्ध उद्योगपती व गांधीवादी जमनालाल बजाज यांचे ते नातू. त्यांचे वडील कमल नयन बजाज यांच्याकडून उद्योग क्षेत्राचा वारसा त्यांच्याकडे आला व त्यांनी तो समर्थपणे यशस्वी करून दाखवला. सेंट स्टिफन्समधून अर्थशास्त्राची व मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी उच्चशिक्षण अमेरिकेतील हावर्ड बिझनेस स्कूलमधून घेतले. देशात परतल्यावर १९६५ साली त्यांनी आपल्या उद्योगाची जबाबदारी स्वीकारली. १९६८मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षीच बजाज ऑटो कंपनीत ते मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर रुजू झाले. सीईओ व चेअरमन अशी जबाबदारीची पदे सांभाळत असताना त्यांनी बजाज स्कूटर व बजाजची रिक्षा देशात सर्वत्र पोहोचवली. स्कूटर व रिक्षा म्हणजे बजाज, असे कित्येक वर्षे या देशात समीकरण होते. यामागे राहुल बजाज यांचे अथक परिश्रम, कल्पकता आणि दूरदृष्टी होती. महाराष्ट्रात पुण्याचा औद्योगिक चेहरा बदलला, तो बजाज ऑटोमुळे. बजाज ऑटो व टाटा मोटर्स या कंपन्यांनी पुण्याचे नाव देशाच्या औद्योगिक नकाशावर मानाने नोंदविले. बजाज व टाटामुळे पुणे परिसरात शेकडो लहान-मोठे औद्योगिक कारखाने उभे राहिले व लक्षावधी रोजगार निर्माण झाले. गुंतवणूक, रोजगार, दर्जेदार उत्पादन, विक्री आणि नफा असे गणित राहुल बजाज यांनी यशस्वी करून दाखवले. पुण्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेल्या आकुर्डी येथे बजाज ऑटोमध्ये इलेक्ट्रिक वाहने निर्माण करण्याचा निर्णय राहुल बजाज यांच्या पुढाकाराने दहा वर्षांपूर्वीच घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेली आत्मनिर्भर भारत ही संकल्पना राहुल बजाज कितीतरी अगोदरपासून राबवत आहेत. चार-पाच दशकांपूर्वी दुचाकी वाहने मर्यादित होती. रस्त्यावर दुचाकी दिसणे हेही दुर्मीळ होते. तेव्हा बजाजची चेतक स्कूटर हे मोठे आकर्षण होते. चेतक मिळविण्यासाठी दहा-दहा वर्षांची तेव्हा प्रतीक्षा यादी होती. त्या काळी बजाज स्कूटर कंपनीच्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त किमतीने बाजारात मिळत असे. बजाज स्कूटरने देशातील मध्यमवर्गीयांना वेड लावले होते. स्कूटर ही चैन नाही, तर गरज आहे, हे राहुल बजाज यांनी समाजमनावर बिंबवले.

ऑटोमोबाइल्स उद्योगांचा पाया राहुल बजाज यांनीच रचला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. राहुल बजाज यांचा पुण्यात कोरेगाव पार्क येथे आलिशान बंगला आहे. पण ते अधिक काळ आकुर्डीला कारखान्याच्या परिसरात असलेल्या निवासस्थानी राहत असत. आपल्या कारखान्याविषयी त्यांना कमालीची आस्था व ओढ शेवटपर्यंत होती. राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे मोठे उद्योगपती होते तसेच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्यांचे विचार व संस्कार राहुल यांच्या मनावर रुजले होते. म्हणूनच समाजसेवेचे भान ते कधी विसरले नाहीत. गांधीवादी विचारांशी काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी जमनालाल बजाज पुरस्कार दिले जातात. पूर्वी अशा पुरस्कारासाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी हे निवड करीत असत, नंतर हे काम ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडे सोपविण्यात आले. जानकी देवी बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून राहुल बजाज यांनी मराठवाड्यात जलक्षेत्रात केलेले कामही लाख मोलाचे आहे. राहुल बजाज हे निर्भिड व्यक्तिमत्व होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांपासून विविध पक्षांतील अनेक दिग्गजांशी त्यांचे चांगले संबंध होते. पण सत्तेवर कोणीही असले तरी त्यांनी राज्यकर्त्यांच्या पुढे पुढे केले नाही. राजकीय नेत्यांची त्यांनी हांजी हांजी कधी केली नाही. देशातील उद्योग क्षेत्राला संरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका ते स्पष्टपणे मांडत असत.

मुंबईतील एका कार्यक्रमात तर केंद्रीय मंत्री व बड्या उद्योगपतींच्या उपस्थितीत सरकारने टीका ऐकून घेतली पाहिजे व तसे निकोप वातावरण देशात असणे गरजेचे आहे, असे परखड बोल सुनावले होते. बजाज ऑटो, बजाज फायनान्स, बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट, असा या उद्योगसमुहाचा साडेआठ लाख कोटींचा विस्तार आहे. पण, राहुल यांचे कामगारांशी संबंधही चांगले होते. चाकण येथील कंपनीत वेतनवाढीच्या प्रश्नावरून कामगारांनी संप केला. पन्नास दिवसांनंतर ते कामावर आले, तेव्हा त्यांचे गुलाबपुष्प देऊन व्यवस्थापनाने स्वागत केले, असा प्रसंग क्वचितच बघायला मिळतो. राहुल बजाज यांना प्रहार परिवाराच्या वतीने विनम्र श्रद्धांजली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -