Monday, March 17, 2025
Homeमहत्वाची बातमीराहुल बजाज : ‘बुलंद भारत की...’चे शिल्पकार

राहुल बजाज : ‘बुलंद भारत की…’चे शिल्पकार

डॉ. केशव साठये

पुणे शहर हे ऑक्स्फर्ड ऑफ ईस्ट म्हणून गेली अनेक वर्षे ओळखले जाते. पण या शहराला उद्योगाची राजधानी ही ओळख करून देणाऱ्या उद्योगांमध्ये बजाज हे नाव आजही अग्रभागी आहे. या सर्वांमागे होते राहुलकुमार बजाज. शनिवारी (१२ फेब्रुवारी) त्यांनी पुण्यात वयाच्या ८३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बजाज यांचे निधन ही केवळ एका यशस्वी उद्योगपतीची एक्झिट नाही, तर व्यवसायातील सचोटी उद्यमशीलता, कल्पकता यांनी परिपूर्ण असलेल्या आणि देशाचा विकास हा ध्यास असलेल्या एका भल्या माणसाचे जाणे आहे आणि म्हणून ते अधिक वेदनादायी आहे.

एखाद्या गावाची, शहराची भरभराट होण्यासाठी तेथील उद्योग-व्यवसाय कळीची भूमिका बजावतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराचा औद्योगिक कायापालट करणाऱ्या प्रमुख उद्योगांमध्ये टेल्को (आताचे टाटा मोटर्स) आणि बजाज ही प्रमुख नावे घेता येतील. या कंपन्यांमुळे अनेक छोटे-मोठे कारखाने आणि लघू उद्योग इथे उभे राहिले. लाखो लोकांना रोजगार मिळाला. जीवनमान सुधारले. साधारण १९७०च्या दशकात हा बदल प्रामुख्याने पाहायला मिळाला. याच कालखंडात दिनक्रमाला वेगही आला. या वेगाची नेमकी गरज ओळखून बजाज उद्योगाने आपल्या स्कूटर निर्मिती उद्योगाचा वेगही वाढवला आणि एक जादुई स्वप्न मध्यमवर्गीयांच्या हवाली केले.

मोरारजी देसाई यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात ढकलगाडीवर बंदी आली होती. ही बंदी हीच संधी समजून नवलमल फिरोदिया यांनी तीनचाकी रिक्षा आणली. राहुल बजाज यांनी त्याला आणखी आधुनिक रूप देऊन देशातील शहरांना प्रवासासाठी, सामानाची ने-आण करण्यासाठी एक उत्तम पर्याय दिला. आज रिक्षा एक दिवस नसेल, तर काय होते याचा अनुभव आपण घेत आहोत. लाखोजणांना या माध्यमातून सन्मानाची रोजीरोटी मिळते. याचे बरेचसे श्रेय हे राहुलकुमार यांनाच द्यायला हवे. केवळ आपल्या देशातच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, इराण, इजिप्त, श्रीलंका, बांगला देश, इंडोनेशिया या देशांच्या रस्त्यावरही बजाज हे नाव या रिक्षांच्या माध्यमातून झळकले. परमिट राज या काळात विविध परवानग्या मिळवून कारखाना सुरू करणे ही कसरत असायची. पण यांनी मात्र उत्तम नियोजन करून परवानगी मिळताच फ्लोअरवर उत्पादन घ्यायला सुरुवात केलेलीही असायची. कामाचा दर्जा आणि उत्पादनाबद्दल आत्मविश्वास यामुळे परवाना मिळण्यापूर्वी थेट उत्पादन सोडले, तर सर्व तयारी पूर्ण झालेली असायची. त्यामुळे बाजाराच्या मागणीला त्वरित प्रतिसाद देण्यात बजाज समूह कायमच आघाडीवर असायचा.

सुमारे ४० वर्षे प्रमुखपदावर राहून बजाज यांनी आपल्या कंपनीच्या उत्कर्षाचा आलेख सतत उंचच ठेवला. ७ कोटी रुपयांची उलाढाल असलेली बजाज ही कंपनी १२ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाला स्पर्श करू शकली, यामागे यांचेच कल्पक हात आहेत. केवळ दुचाकी-तीनचाकीच नव्हे, तर अनेक गृहोपयोगी उत्पादनाच्या बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करण्यात हा समूह यशस्वी झाला. सहसा उद्योगपती कारखाना पुण्यात असला तरी मुंबईतील ऐषारामी वस्ती निवासासाठी निवडतात. यांनी मात्र आपल्या कारखान्याच्या आवारातच राहणे पसंत केले. त्यामुळे कामगार वर्गालाही एक प्रेरणा आणि उत्तेजन नक्की मिळाले असणार.

केवळ आपल्या उद्योगापुरती राहुल यांची दृष्टी सीमित नव्हती, तर देशाच्या औद्योगिक विकासासाठी काय करायला हवे, खुली बाजारपेठ, अंतरराष्ट्रीय व्यापार, ग्राहक केंद्रित धोरण याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. केंद्र सरकार-राज्य सरकार आपले उद्योग धोरण ठरवताना राहुल बजाज काय म्हणतात, याचा आवर्जून कानोसा घ्यायचे. यातच त्यांच्या उद्यमशीलतेची चुणूक दिसते. व्यवसाय सांभाळताना आपला देशप्रेमाचा वारसाही त्यांनी जागृत ठेवला. समाजासाठी काही तरी देण्याची परंपरा यांनी कायम ठेवली. जमनालाल बजाज फाऊंडेशन असो वा जानकीदेवी बजाज ट्रस्ट असो, समाजातील दीनदुबळ्या जनतेसाठी, शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यांनी आपला हात कायमच देणारा ठेवला.

‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर… हमारा बजाज’ या ओळी आपल्या देशात अनेक दशके राज्य करत होत्या. ही केवळ जाहिरातीची कॉपी नव्हती, तर एका उद्यमशीलतेतून तयार झालेल्या दुचाकी विश्वाची ती वेगवान भरारी होती. एका इंग्रजी नियतकालिकाचे शेवटचे पान हे दहा वर्षांसाठी आपली स्कूटर पार्क करायला राखीव ठेवून बजाज यांनी आपल्या आक्रमक मार्केटिंगचा एक धडाच उद्योग विश्वापुढे ठेवला होता. १९४८मध्ये गुडगावमध्ये व्हेस्पा स्कूटरच्या रूपाने पेरलेले हे बीज आकुर्डी (पुणे) वळूंज (औरंगाबाद) इथे जोमाने फुलले. ८ डिसेंबर १९६०ला पहिली स्कूटर पुण्याच्या कारखान्यातून (आकुर्डी) रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली. ६-७ वर्षे स्कूटरला नंबर लावलेले आणि ती मिळाल्यावर दिवाळी साजरी करणारे ग्राहक आजही प्रिया-चेतक या स्कूटरच्या आठवणीने हळवे होतात. स्मरणरंजनात दंग होतात. एखाद्या निर्जीव उत्पादनाचे मानवीकरण करण्याच्या बजाज उद्योग समूहाच्या या कामगिरीला आणि पर्यायाने राहुल बजाज यांच्या योगदानाला सलाम करण्याव्यतिरिक्त आपण काय वेगळे करू शकतो?

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -