Sunday, March 16, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यस्वत:वर प्रेम करा!

स्वत:वर प्रेम करा!

तेजश्री प्रधान, अभिनेत्री

प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाइन्स डे साजरा व्हायला हवा. खरं तर प्रेमाची सुरुवात ही स्वत:पासून व्हायला हवी. म्हणजेच या दिवसाच्या निमित्ताने आपण स्वत:वर भरभरून प्रेम करू या. सोशल डिस्टन्सिंगप्रमाणे नकारात्मक विचारांशीही डिस्टन्सिंग पाळू या. हा दिवस आपल्यावर खरंखुरं प्रेम करणाऱ्या माणसांसोबत साजरा करू या. कोरोना काळात माणसाने माणुसकीच्या प्रेमाचा प्रत्यय दिला. हे प्रेम असंच वृद्धिंगत होऊ देऊ या…

व्हॅलेंटाइन्स डे म्हणजेच प्रेमाचा दिवस, प्रेम करणाऱ्यांचा दिवस. प्रेमाचं प्रतीक म्हणून व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जातो. प्रेमाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान तर आहेच, मात्र कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या काळात प्रेमाचं महत्त्व नव्याने अधोरेखित झालं आहे. प्रेमाची व्याख्या फक्त प्रेमी युगुलांपुरती मर्यादित नाही, तर प्रेम ही खूप उदात्त अशी भावना आहे. कोरोनाच्या काळात माणसाचं माणुसकीवरचं प्रेम प्रकर्षाने दिसून आलं. या अत्यंत कठीण आणि संघर्षाच्या काळात लांबवरचे आप्तस्वकीय पोहोचू शकत नसताना शेजाऱ्यापाजाऱ्यांनी, मित्रमैत्रिणींनी दिलेला आधार, केलेली मदत खूप मोलाची ठरली. माणसाने माणुसकीवरच्या प्रेमापोटीच हे केलं असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. कोरोना काळात अनेक ज्ञात-अज्ञात चेहरे लोकांच्या मदतीला धावले. स्वत:च्या आरोग्याची तमा न बाळगता रुग्णांची सेवा केली, मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार केले. डॉक्टर्स तसंच वैद्यकीय क्षेत्रातले कर्मचारी रुग्णांसाठी झटले. माणुसकीवरचं प्रेम अजून जिवंत असल्यामुळेच हे सर्व होऊ शकलं. अन्यथा, हा कठीण काळ आपण कसा काढला असता? प्रेमातल्या समंजसपणाची ही भावना जपण्यासाठी, मनोमन रुजवण्यासाठीही व्हॅलेंटाइन्स डे साजरा व्हायला हवा.

मला वाटतं की, व्हॅलेंटाइन्स डे हा प्रेमाचा दिवस असल्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी तो साजरा व्हायला हवा. अर्थात हे प्रेम कुणावरही असू शकतं. आता प्रेम किंवा कोणतीही भावना व्यक्त करण्यासाठी दिवस वगैरे कशाला हवा, असं अनेकांचं मत असलं तरी आपण दररोज आपल्या आईला, बाबांना, मित्राला, मैत्रिणीला, नवऱ्याला किंवा अन्य कुणालाही माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं सांगत बसत नाही. त्यामुळे अशा एखाद्या दिवसाचं निमित्त साधून आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो, त्या प्रत्येकाला या प्रेमाची जाणीव करून देण्याचा हा दिवस आहे. या दिवसानिमित्ताने आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या आनंदासाठी काहीतरी करू शकतो. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो. आपण निसर्गावरचं प्रेम व्यक्त करू शकतो, प्राणी-पक्ष्यांसाठी काही तरी चांगलं करू शकतो, किंबहुना या दिवशी चांगली सुरुवात करू शकतो. म्हणूनच व्हॅलेंटाइन्स डे कडे फक्त पाश्चिमात्य संस्कृतीचं आक्रमण म्हणून न बघता, जगाला प्रेम अर्पण करण्याचा दिवस म्हणून पाहायला हरकत नाही.

खरं तर व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने आपण स्वत:वर प्रेम करायला शिकायला हवं. आपण स्वत:वर प्रेम केलं नाही, तर इतरांवर प्रेम करू शकणार नाही. स्वत:कडे दुर्लक्ष करून किंवा स्वत:ला कमी लेखून आपण दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रेम देऊ शकत नाही. आधी आपण स्वत: आनंदी असायला हवं. आपण स्वत: आनंदी असलो, तरच इतरांना आनंदी ठेवू शकतो. मला वाटतं की, सध्या वातावरणात बरीच नकारात्मकता आहे. अशा नकारात्मक विचारांनी आपण आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आणत आहोत. आपल्या आसपास बरंच काही घडताना दिसतंय. हातात नसलेल्या गोष्टी आपल्या शरीराला नुकसान पोहोचवत आहेत आणि पुढेही पोहोचवत राहतील. आपण आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणं पाहत आहोत, अनुभवत आहोत. अशा परिस्थितीत स्वत:ला सांभाळणं, स्वत:ची काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे. एवढं तर आपण नक्कीच करू शकतो. स्वत:ला सांभाळणं म्हणजे फक्त मास्क घालून बाहेर पडणं नव्हे, तर आपण आपल्या मेंदूला आणि विचारांनाही मास्क लावायला हवा.

मेंदूला मास्क लावायचा म्हणजे काय, तर डोक्यात फक्त आणि फक्त चांगले विचार आणायचे. तोंडावरचा मास्क घातक विषाणूंना शरीरात जाण्यापासून रोखतो. त्याचप्रमाणे मेंदूवरच्या मास्कने नकारात्मक विचारांना रोखण्याचं काम करायला हवं. आता हा मास्क कसा लावायचा, हे आपलं आपणच ठरवायचं आहे. वाईट विचारांना कात्री लावून चांगल्या विचारांच्या प्रवेशाचा मार्ग आपणच सुकर करायचा आहे आणि हे फक्त आणि फक्त स्वत:वर प्रेम केल्यानेच प्रत्यक्षात येऊ शकतं. कोरोनाच्या काळात आपण नियम पाळून जगत आहोत. मला वाटतं, याच नियमांचं पालन आपल्या विचारांमध्येही व्हायला हवं. आपण सोशल डिस्टन्सिंग पाळत असताना नकारात्मक विचारांचं डिस्टन्सिंग पाळणंही खूप आवश्यक आहे. सध्याचं जग खूपच बेभरवशी झालं आहे. कधी काय होईल याचा काहीच नेम नसतो. पुढे काय वाढून ठेवलं आहे, हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे उद्याची काळजी करत बसण्यापेक्षा आजचा दिवस माझा, असं म्हणून छान जगून घ्यायचं. शक्य तितकं चांगलं राहायचं. आवडत्या गोष्टी करायच्या. छंद जोपासायचे. मुख्य म्हणजे स्वत:ला वेळ द्यायचा. आयुष्य म्हटलं की धावपळ, दगदग, संघर्ष आलाच. पण या सगळ्यातून स्वत:साठी हक्काचा वेळ राखून ठेवायला हवा. यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने हा संकल्प करायला काय हरकत आहे? इतरांवर जमलं नाही तरी स्वत:वर प्रेम करून, स्वत:साठी जगून हा दिवस साजरा करायला काय हरकत आहे? व्हॅलेंटाइन्स डे आपला हक्काचा दिवस म्हणून राखून ठेवायला काय हरकत आहे?

प्रेम ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात खूप गरजेची असते. कारण, हेच प्रेम आपल्याला नकारात्मक विचारांपासून लांब राहायला मदतही करत असतं. या जगात आपलं कोणी तरी आहे, आपला विचार करणारं कोणी तरी आहे, आपली काळजी करणारं कोणी तरी आहे, ही जाणीव आपलं जगणं समृद्ध करत असते. आपल्या जगण्याला नवा आयाम देत असते. आता ही प्रेम करणारी व्यक्ती कोणीही असू शकते. ती प्रियकर किंवा प्रेयसीच असायला हवी, असं नाही तर आपली आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण, आजी, आजोबा किंवा अन्य कोणीही असली तरी तिच्या प्रेमाच्या साथीने आपण आपलं आयुष्य आनंदाने जगू शकतो. म्हणूनच प्रेमाला आपल्या आयुष्यात स्थान द्यायला हवं. ते झिडकारता कामा नये. आज आपण आपल्या आसपास एकटेपणाची भावना वाढत चालल्याचं बघतो. आपण एकटे आहोत, आपलं कोणी नाही, असा विचार करून अनेकजण आत्मघाताचा मार्ग पत्करतात. पण, आयुष्यातलं हे नैराश्य दूर करण्याची क्षमता फक्त प्रेमात असते. प्रेमाचा, मायेचा हात आपल्याला नवी उभारी देतो. कोरोना काळात याची प्रचिती वारंवार आली आहे. विलगीकरणात राहिलेल्या लोकांना डबे, जीवनावश्यक सामान देण्याचं काम शेजाऱ्यापाजाऱ्यांनी केलेलं आहे आणि हीच प्रेमाची भावना मला खूप महत्त्वाची वाटते.

एक कलाकार म्हणून माझ्यावर किती लोक प्रेम करतात, माझ्या सोशल मीडिया पोस्टना किती माणसं लाइक करतात किंवा त्यावर किती कमेंट्स आल्या यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे माझ्या गरजेला किती माणसं धावून आली? ही धावून आलेली माणसं माझ्यावरील प्रेमापोटी आली होती. ही माणसं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी असली तरी त्यांचा खरेपणा खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच मला वाटतं की, यंदाचा व्हॅलेंटाइन्स डे फक्त दिखावा म्हणून साजरा न करता आपल्यावर खरं प्रेम करणाऱ्यांच्या आनंदासाठी साजरा करू या. त्यांचं असणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे त्यांना सांगू या. त्यांच्या प्रेमाची आपल्याला जाणीव आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवू या. प्रेमाचा हा दिवस आपल्यासाठी झटणाऱ्यांना समर्पित करू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -