मुंबई : पुण्यात किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला भाजप सहजासहजी खपवून घेणार नाही. आम्ही यासंदर्भात अमित शाह आणि केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा असतानाही त्यांच्यावर हल्ला झाला. त्यामुळे केंद्रातील सुरक्षा प्रमुख गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
केंद्राच्या सुरक्षा प्रमुखांनी पुणे पोलीस आयुक्तांकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणात पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेचीही चौकशी होणार आहे. सुट्टीचा दिवस असूनही पालिकेच्या आतमध्ये १०० लोक कसे घुसले? यावेळी केंद्रीय पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे आता केंद्रातील सुरक्षा प्रमुखांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना त्याची वेगळी तक्रार दाखल करायला सांगितली आहे. अन्यथा केंद्रातील सुरक्षाप्रमुख न्यायालयात जातील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील हे गुरुवारी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही प्रत्युत्तर दिले. गेल्या २७ महिन्यांत नवाब मलिक यांच्या जावयाला अटक होण्यापासून शाहरुख खानच्या मुलाच्या अटकेपर्यंत अनेक प्रकरणं घडली. पण त्यांनी दाद मागण्यासाठी न्यायालयाचा पर्याच निवडला. पण पहिल्यांदाच आरोप सहन झाले नाही म्हणून किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या हे केंद्रीय यंत्रणांचा उपयोग करतात असे संजय राऊत यांना वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले, हाच महाराष्ट्राचा अपमान : चंद्रकांत पाटील
महाविकासआघाडीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचे म्हणतात. पण पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, जगातील लहान लोकसंख्येच्या ६० देशांइतके कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले होते. हाच महाराष्ट्राचा खरा अपमान आहे. संजय राऊत गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांचा मुद्दा उपस्थित करतात. पण त्यांना महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात एकाच सरणावर २४ मृतदेह जाळण्याची वेळ आली, याचा सोयीस्कररित्या विसर पडतो. उत्तर प्रदेशात धार्मिक कारणांमुळे किंवा गरिबीमुळे प्रेतं नदीत सोडली असावीत. पण कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकार येथील परप्रांतीयांना राज्यातच थांबवण्याचा आत्मविश्वास देऊ शकले नाही. हा महाराष्ट्राच खरा अपमान असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.