लखलखत्या फॅशन जगताचा धुरकट काळा चेहरा

Share

वसुंधरा देवधर, मुंबई ग्राहक पंचायत

प्रगत समजल्या जाणाऱ्या देशांमधील बाजारपेठ आणि तेथील बाजारचलीत संस्कृतीने आपल्याकडे चंचुप्रवेश केला, त्यावेळी सर्वसामान्य ग्राहक जाम खूश झाला. नव्याने ओळखीचं झालेलं खरेदीचं साजरं रूप त्याला सुखावून गेलं. आर्थिक उदारीकरणाचे सर्व आनुषंगिक परिणाम हळूहळू दृग्गोचर होऊ लागले. ‘चंचुप्रवेशे मुसल प्रवेश:’ ही उक्ती कधी आणि कशी सार्थ झाली हे सामान्य ग्राहकांच्या लक्षातही आलं नाही. खासकरून कपड्यांचे विविध प्रकार, नाना तऱ्हा व जागतिक ब्रॅण्ड्स आले. त्यासोबत अॅक्सेसरीज या नावाने मिरवण्याच्या अनेक वस्तूंचा एक संच उपलब्ध होऊ लागला. अशा कपड्यांबरोबर तशी पर्स, पादत्राणे, कानातले, गळ्यातले किंवा अगदी मनगटी घड्याळ, मोबाइल कव्हर आणि काय काय! हे सगळे बदल घडताना जागतिक पातळीवरील अनेक ब्रॅण्ड्स आपली उत्पादने देशभर ओतत राहिले. ही उत्पादने वापरणे म्हणजे, आधुनिक, अप टू डेट असणे आणि हो सुंदर दिसणे, असे जाहिरातींच्या द्वारे ग्राहकाच्या मनावर ठसवीत राहिले. प्रत्येक सणा-समारंभासाठी नवीन, अगदी अलीकडे बाजारात आलेली वस्तू, कपडे किंवा एखादे ब्रेसलेट तरी घ्यावेच, अशी पद्धतच पडली. असे करण्यासाठी काही तडजोडी करण्याससुद्धा मागे-पुढे पाहायचे नाही, अशी विचारधारा जणू रुजली. त्यातून आर्थिक फायदा झाला तो फॅशन रुजवणाऱ्या आणि ग्राहकांना भुलविणाऱ्या जागतिक ब्रॅण्ड्सचा.

फॅशन म्हणजे नक्की काय? एकदम अप टू डेट म्हणजे कसे? याचे निकष काय? ते कुणी ठरवायचे? हे सगळे कशासाठी, कुणासाठी? लेटेस्ट, ब्रँडेड, लिमिटेड एडिशन इत्यादी विशेषणे असणाऱ्या वस्तू, वस्त्रे इत्यादींची महत्ता कोण वाढवतो? फास्ट फॅशन म्हणजे काय? फॅशन जुनी कधी होते? मग उरलेले उत्पादन कुठे विकतात? प्रत्यक्ष पैशात मोजली जाणारी किंमत आणि आनुषंगिक किंमत हे सगळे प्रवाह-पतिताप्रमाणे खरेदी करत जाणाऱ्या सामान्य ग्राहकाला, नागरिकांना कधी कळेल का? असे सगळे प्रश्न डोक्यात गुंता वाढवीत मन बैचेन करू लागलेत. याचं कारण म्हणजे काहीशा जुन्या पण धक्कादायक बातम्या!

फॅशन विश्वातील आघाडीचे ब्रॅण्ड्स वारेमाप उत्पादन करतात. एका रात्रीत आधी उपलब्ध असणारी विविध वस्त्रे आणि त्यासोबतच्या पर्स, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने इ. विविध वस्तू दुकानामधून काढून घेतात आणि त्या ठिकाणी नवीन, लेटेस्ट म्हणून मानली गेलेली उत्पादने विक्रीसाठी येतात. जिथे थंडी-उन्हाळा अशा ऋतूंमध्ये वेगवेगळी वस्त्रे-प्रावरणे वापरावी लागतात. तिथे एंड ऑफ सीझन सेल लावला जातो. मात्र त्या सेलमध्ये विशिष्ट दर्जाची वस्त्रे व उत्पादनेच उपलब्ध असतात, जी सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहक वापरातील. एक्सक्लुझिव्ह अशा शिक्क्याने अगर लिमिटेड एडिशन म्हणून मिरवण्यासाठी उत्पादित झालेला माल अशा सेलमध्ये नसतो. बूट, चामड्याच्या विविध वस्तू किंवा अगदी हटके, विशिष्ट कारणासाठी वापरण्यात येणारी वस्त्रे आणि अॅक्सेसरिज इ. जरी शिल्लक असल्या तरी सेलमध्ये ठेवल्या जात नाहीत. दुसऱ्या कुठल्या देशात विक्रीसाठी नेत नाहीत. गरीब देशात दान म्हणून पाठविल्या जात नाहीत. कारण १५ हजाराला विकलेला एखादा जिन्नस जर सेलमध्ये स्वस्तात किंवा दान म्हणून फुकटात उपलब्ध झाला, तर त्याच्याभोवतीचे लिमिटेड एडिशनचे वलय नाहीसे होणार. ब्रॅण्डच्या नावातून तो वापरणाऱ्याचे मोठेपण (?) सिद्ध होते, असा लौकिक ज्या ब्रॅण्डने मिळवलाय, तो सांभाळायला असे केले जाते.

मग त्या मालाचे काय करतात? डेन्मार्क, स्वीडन, फ्रान्स आणि इतर काही ठिकाणी टनावारी कपडे आणि इतर काही उत्पादने जाळून टाकल्याच्या बातम्यांनी २०१६ ते २०१९ दरम्यान मोठीच खळबळ माजली होती. स्वीडनमध्ये १९ टन आणि डेन्मार्कमध्ये १२ टन, वापरण्यायोग्य कपडे जाळून टाकल्याच्या आरोपाला उत्तर देताना त्या कपड्यांमध्ये ग्राहकांसाठी अनारोग्यकारक रसायने होती, असा खुलासा ‘एच आणि एम’ने केला.

‘बरबेरीबर्न’ या नावाने सोशल मीडियावर जे तपशील प्रसिद्ध झाले, त्यातून ‘बरबेरी’ या महागड्या फॅशन ब्रॅण्डने २०१८ मध्ये ३८ मिलियन डॉलर्सचे वापरण्यायोग्य कपडे जाळून टाकले, ही माहिती बाहेर आली. त्याचवेळी फॅशन विश्वातील दुटप्पीपणाही उघड झाला. कारण हीच बडी मंडळी मानभावीपणाने फॅशन विश्वातून जे काही टाकाऊ ठरेल त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी तत्पर आहोत, असे सांगत होती. मात्र कपडे जाळून टाकण्याऐवजी त्यांचा दुसऱ्या एखाद्या पद्धतीने पुनर्वापर करणे हे खर्चिक आहे, म्हणून ते जाळले गेले, असेही सांगितले गेले. कारण काय तर, झिप, लायनिंग, धागेदोरे, बटणे, साखळ्या इ. वेगळे करायला लागेल आणि त्या कपड्यांच्या चिंध्या (श्रेडिंग) करायच्या तरी जाळण्यापेक्षा ते महाग पडते. त्यामुळे प्रदूषणकारक उपाय बिनदिक्कत केले जातात.

मुळात मासिक किराणाप्रमाणे तयार कपडे विकत घ्यायला हवेत, अशी ग्राहकाची मनोधारणा व्हावी, यासाठी बाजारात वारेमाप उत्पादने ओतली जातात. एकट्या अमेरिकेत दरवर्षी सरासरी ११ मिलियन टन वजनाची वस्त्रे कचरा म्हणून त्यागली जातात. त्यापैकी अंदाजे १५% परत वापरात येतात. बाकीचे कचराडेपोत किंवा जाळायला भट्टीत जातात. यात असलेले कृत्रिम धागे अधिक प्रदूषण करतात.

आपल्याला ती माहिती नवीन असेल. पण विकसित देशातील युवा वर्गाने तिची दखल घेऊन स्वत:च्या खरेदीचे निर्णय बदलायला सुरुवात केली आहे, ही बाब आश्वासक आहे. गेल्या अंदाजे पाच वर्षांत लखलखत्या फॅशन उद्योगाचा जो काळा चेहरा समोर आणला गेलाय, त्याची जाणीव जागरूक ग्राहक गट सातत्याने करून देत राहिलेत, त्यामुळे तरुण ग्राहकांनी धारणाक्षम उपभोग आपलासा करायला सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवरील उत्पादने खरेदी करायला सुरुवात केली आहे. आपणही आपले खरेदीचे निर्णय अधिक डोळसपणे घेऊया.

mgpshikshan@gmail.com

Recent Posts

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार!

पुनर्विकास एमएमआरडीए करणार; फडणवीस-शिंदेंचा थेट दिलासा! मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत…

40 minutes ago

NCERT Textbook Update : सातवीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार !

नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकातून मुघल आणि दिल्ली राजवटीचे सर्व…

42 minutes ago

नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळायचं… हेच तुमचं राजकारण का? फडणवीसांनी वडेट्टीवारांना फटकारले!

मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६…

1 hour ago

“तुमच्या नेत्यांना आवरा!” काँग्रेसच्या वाचाळवीरांविरुद्ध भाजपचा हल्लाबोल, पहलगाम हल्ल्यांविरुद्ध वक्तव्यावर संताप

पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने साधला निशाणा  नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी…

1 hour ago

तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या…

1 hour ago