नवी दिल्ली : कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यांतर्गत प्रवास, पर्यटन क्षेत्र यावरील बंधने पूर्णपणे हटवण्यात आल्याने वाहतूक पूर्ण क्षमतेने चालू आहे. ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र संपामुळे एसटी बंद आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा २७ ऑगस्टपासून संप कायम आहे. यावर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांसह त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला दिलेली १२ आठवड्यांची मुदत आज, गुरुवारी संपणार आहे. या अहवालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला अभिप्राय देण्याच्या सूचना न्यायालयाच्या आहेत. यामुळे अहवालात विलीनीकरणाबाबत काय निर्णय होतो, याकडे एसटी कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेचे लक्ष आहे. कोरोनापूर्व काळात राज्यात सुमारे लाखभर फेऱ्या एसटीच्या होत होत्या.
सध्या आठ ते साडेआठ हजार फेऱ्या होतात. यामुळे ९२ टक्के एसटी वाहतूक बंद आहे. संपकाळातील गेल्या १०० दिवसांत एसटी कर्मचारी आणि कुटुंबीय असे एकूण ८० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
जानेवारी अखेर महामंडळातील ९२,२६६ कर्मचाऱ्यांपैकी २७,१२७ संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. एकूण ६,१५६ कर्मचारी बडतर्फ झाले असून ११,०२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. २५० आगरांपैकी २४३ आगार चालू झाले आहेत, असा दावा एसटी महामंडळाने केला आहे.