मुंबई / नागपूर : राज्य सरकारने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णया विरोधात आज, सोमवारी मुंबई, नागपूर, अकोल्यासह विदर्भात काही ठिकाणी तसेच पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्या, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वर्षभर शाळा या ऑनलाइन होत्या. ऑनलाइन शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण आणि मागासभागातील ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली. ऑनलाइन शिक्षण दिल्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेणे योग्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका, असे सांगत, दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला.
या निर्णयाला विरोध करण्यासाठी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच विद्यार्थी एकतेच्या घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. शाळा जर ऑफलाईन असत्या तर परीक्षा ऑफलाईन घेण्यास हरकत नाही. मात्र, ऑनलाइन शाळा घेऊन ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना पटलेला नाही. परीक्षासंदर्भात बैठक घेताना शिक्षण मंत्री या ऑफलाईन बैठकीला उपस्थित न राहता ऑनलाइन उपस्थित होत्या. ऑफलाइन परीक्षेचा निर्णय ऑनलाइन बैठकीत कसा घेता, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आमचे जरी लसीकरण झाले असले तरी आम्ही अजूनही मानसिक आणि बौद्धिक दृष्टीने ऑफलाईन परीक्षा देण्यास समर्थ नाही. परीक्षा न घेता या पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुढील वर्षी ऑफलाईन शाळा सुरू करून नंतर परीक्षा घ्यावात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.