मुंबई : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात लवकरच किराणा दुकानं आणि सुपर मार्केट्समध्ये वाईन मिळणार आहे. सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे सरकारवर जोरदार टीका होताना दिसतेय. भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाईंनीही आता या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला सर्वसामान्यांनी विरोध केला पाहिजे अन्यथा अनेक दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो तरुण व्यसनाकडे वळतील, अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होतील, अजून गुन्ह्यांमध्ये वाढ होईल असं देसाई म्हणाल्या. तसंच ‘हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नसून ज्यांनी वाईन फॅक्टरीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्या बड्या उद्योजकांच्या आणि बड्या राजकारण्यांच्या फायद्यासाठी घेतलेला आहे, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घ्यायचा असेल तर मग, शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित भाव द्या, महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. वाईनमध्ये अल्कोहोल असते, वाईन पिल्यावरसुद्धा गाडी चालवताना पोलीस कारवाई करतातच. याचे कारण त्याने नशा चढते. त्यामुळे आता जर विरोध केला नाही तर, पुढे वाईन नंतर काही महिन्यातच सुपर मार्केटमध्ये दारू विकतील, गांजा विकतील, पुन्हा गुटखा विकायला परवानगी देतील. वेळीच या सरकारची नशा उतरवा, हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडूया, असं आवाहन तृप्ती देसाई यांन केलं आहे.