Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीडिसले गुरुजींना पीएचडीसाठी अमेरिकेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न?

डिसले गुरुजींना पीएचडीसाठी अमेरिकेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न?

सोलापूर : परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी अमेरिकेत पीएच.डी. मिळविण्यासाठी रजेची मागणी केली आहे. त्यावेळी तुम्ही शाळेचे काय करणार? असा सवाल शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी विचारल्याचे सांगितले जाते. इतकेच नाही तर डिसले गुरुजी यांचा अर्ज दीड महिन्यापासून अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून असल्याचेही समजते. मात्र, याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी नियमांवर बोट ठेवले. तर डिसले गुरुजी प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे ‘संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी डिसले गुरुजी यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी काय केले? मागील तीन वर्षात त्यांनी शाळेसाठी काय केले? याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कामाची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्याला सांगितले आहे. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही बाब अभिमानास्पद आहे; पण त्यांच्या या कर्तृत्वाचा परितेवाडी शाळेला काय उपयोग झाला, हे तपासावे लागणार आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आम्हाला उपयोग हवा आहे. त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी इतकी मोठी रजा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे परवडणारे नाही’ असे शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले.

याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांनी नियमांवर बोट ठेवले. ‘डिसले गुरुजी काल जिल्हा परिषदेत आले होते. ते आल्यानंतर समजले की ते अमेरिकेतील विद्यापिठात पीएचडी करण्यासाठी जात आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे पत्र इंग्रजीमधून टाईप करुन आणले होते. परंतु परदेशात शिक्षण घेण्यापूर्वी किंवा सेवेमध्ये असताना शिक्षण घेण्यासाठी आपल्याला एखाद्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी एक प्रक्रिया आहे ती पार पाडायला हवी. शाळेतील मुख्याध्यापकाकडे त्यांनी अर्ज करायला हवा. त्या अर्जावर तो किती दिवसांचा कोर्स आहे? कोणत्या विद्यापीठात तो ते करणार आहेत? त्या विद्यापीठाच्या प्रॉस्पेक्टसमध्ये काय लिहिले आहे? हे व्यवस्थित लिहून तो अर्ज त्यांनी मुख्याध्यापकामार्फत गटशिक्षण अधिकाऱ्याकडे सादर केल्यानंतर तो अर्ज गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत शिक्षणाधिकारी आणि तिथून तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तो मान्यतेसाठी जातो. काल ते परस्पर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले होते. तिथून माझ्याकडे पाठवण्यात आले. त्यांनी दोन पत्र तयार करुन आणले होते. परंतु कुठलीही परवानगी न घेता ते त्या पत्रावर सही घेण्याच्या प्रयत्नात होते. असे कुठल्याही प्रकारचे बेशिस्त वर्तन या कार्यालयाकडून चालू दिले जाणार नाही’, असे शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले.

तसेच ‘परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्यांना पासपोर्टची आवश्यकता आहे. यापूर्वीही एका चौकशीमध्ये आम्ही त्यांच्याकडे पासपोर्ट मागितला होता. तो त्यांनी दिलेला नाही. संबंधित विद्यापीठाला केलेला अर्ज त्यांनी या कार्यालयात सादर केलेला नाही. ते अमेरिकेतील कोणत्या विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी जाणार आहेत, याचा कुठेही उल्लेख नाही. डिसले गुरुजींना काही दिवसांपूर्वी ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळाला आहे. त्याचा आणि आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव मागवण्याचा काही संबंध नाही. कारण, कोणताही शिक्षक ज्यावेळी उच्च शैक्षणिक अहर्ता धारण करत असेल त्यावेळी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. डिसले गुरुजी काल सीओ साहेबांचे प्रमाणपत्र घेऊन आल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की तुम्ही विहित पद्धतीचा अवलंब करा आणि कार्यालयामार्फत तुमचा अर्ज येऊ द्या, असे सांगत शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवले आहे.

तर ‘मला अमेरिकन सरकारकडून शिक्षकांसाठी दिली जाणारी फुल प्रेस स्कॉलरशिप मिळाली आहे, याचा मला आनंद आहे. यासाठी मला २०२२ च्या ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत मला अमेरिकेत जाऊन पिस इन एज्यूकेशन या विषयावर अधिक सखोल संशोधन करण्याची संधी मिळत आहे. त्यासाठीच मी प्रशासनाकडे अध्ययन रजेचा अर्ज केला होता. मला अपेक्षित होते की त्या अर्जावर मला काहीतरी निर्णय मिळेल. त्यासाठी मी काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांचे निकष आहेत, त्यांच्या निर्णयानंतरच मला याबाबत अधिक माहिती सांगता येईल. माझ्यापर्यंत अद्याप कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी कुठलेही लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. ते प्राप्त झाल्यानंतर मी त्याबाबत जास्त बोलू शकेल’, अशी प्रतिक्रिया डिसले गुरुजी यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -