जगप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि भारताचा वर्ल्डक्लास फलंदाज विराट कोहली यांचे आपापल्या क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान आहे. गेल्या आठवड्यात दोघेही चर्चेत राहिले. कोरोना प्रतिबंधक लस न घेता ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाची वारी करणे जोकोविचला महागात पडले. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मालिकेतील पराभवानंतर कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयाचीही वेळ चुकली आहे.
कोरोनासारख्या कुठल्याही विषाणूला किंवा व्हेरिएंटकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मागील दोन-तीन वर्षांच्या कालावधीत ज्यांना कोरोनाची लागण झाली आणि ज्यांनी आपले कुटुंब सदस्य तसेच नातेवाईक गमावले, तेच या भीषण महामारीचे गंभीर परिणाम जाणून आहेत. कोरोनाच्या लाटांवर लाटा येत असल्याने प्रतिबंधक नियमांचे पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे. कोरोनावर प्रतिबंधक लस आल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. भारतानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कंबर कसली आहे. देशातील लसीकरण मोहिमेला रविवारी वर्षपूर्ती झाली. तोवर भारतातील लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या १५७ कोटींहून अधिक आहे. मात्र आजही अनेक जण लस घेणे टाळताहेत. जगप्रसिद्ध जोकोविचनेही अशीच भूमिका घेणे ही दुर्दैवी बाब आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांच्या निमित्ताने तो जगभर फिरत आहे. लस न घेता तो अमेरिकेसह जगभरातील अनेक प्रमुख देशांमधील स्पर्धांमध्ये सहभागी झाला. त्याला कुणीही अडवले नाही. मात्र ऑस्ट्रेलियाने त्याला हिसका दाखवला. तसे करणे आवश्यकही होते. लसीकरण न झाल्याने जोकोविचचा धोका अमुक एका व्यक्तीला नसून संपूर्ण समुदायाला आहे, हे ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशनमंत्री अॅलेक्स हॉल यांचे म्हणणे योग्यच आहे. ऑस्ट्रेलियात कोरोना प्रतिबंधक नियम कडक आहेत. या नियमांच्या आधारे तेथील सरकारने जोकोविचला आंतरराष्ट्रीय टेनिसमधील एक प्रमुख ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखले. शिवाय नियमभंग केल्याप्रकरणी तीन वर्षांची बंदी घातली. ऑस्ट्रेलिया सरकारच्या कठोर निर्णयानंतर लस न घेणाऱ्यांनी योग्य तो धडा घ्यावा. तसेच प्रत्येक देशाने असेच कडक नियम लागू करावेत, असे सांगणे आहे.
जोकोविचवरील कारवाईने अवघे जग हादरले. दुसरीकडे, विराट कोहलीने भारतीय क्रिकेट कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा अचानक राजीनामा दिल्याने भारताच्या क्रिकेटविश्वामध्ये खळबळ माजली. निमित्त ठरले दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका पराभवाचे. पहिली कसोटी जिंकूनही कोहली आणि सहकाऱ्यांना तीन सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पराभव पाहावा लागला. अपयशी सुरुवातीनंतर यजमान संघाने केलेले दमदार पुनरागमन कौतुकास्पद आहेच. मात्र, पाहुण्या संघाची पीछेहाट का झाली, याचेही मंथन आवश्यक आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे अमुक एकामुळे हरलो, असा निष्कर्ष काढता येत नाही. भारताचा संघ कसोटीनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार असल्यामुळे काही प्रमुख क्रिकेटपटू अद्याप दक्षिण आफ्रिकेत आहेत. संपूर्ण दौरा आटोपल्यानंतर मालिका पराभवाची कारणे शोधता आली असती; परंतु मालिका पराभवानंतर काही तासांमध्ये विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून कसोटी नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. कोहलीच्या निर्णयामुळे धक्का बसला, असे अनेक जाणकारांनी म्हटले आहे. मात्र त्याचा निर्णय अपेक्षित होता. केवळ त्याची वेळ चुकली. गेल्या चार-पाच महिन्यांत विराट हा क्रिकेट कारकिर्दीसंबंधित निर्णय घेताना कमालीची घाई करतो आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आयोजनाखाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) गेल्या वर्षी आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपपूर्वी विराटने याच प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरूनही खूप चर्चा घडली.
यूएईत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी ढेपाळली. त्यानंतर बीसीसीआयने कोहलीकडून एकदिवसीय (वनडे) क्रिकेटचे कर्णधारपद काढून घेतले आणि टी-ट्वेन्टीसह वनडे नेतृत्वाची धुरा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माकडे सोपवली. वनडे कर्णधारपद काढून घेताना बीसीसीआयच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने मला विचारले नाही, असे विराटचे म्हणणे होते. मात्र कसोटी कॅप्टन्सी सोडताना त्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बीसीसीआयला निर्णय कळवला. मागील चार महिन्यांच्या कालावधीत कोहलीने आयपीएलमधील बंगळूरु रॉयल चॅलेंजर्ससह भारताच्या तिन्ही प्रकारांतील कर्णधारपद सोडले आहे. नेतृत्व सोडण्याच्या निर्णयावर माजी कसोटीपटू आणि भाजपचे विद्यमान खासदार गौतम गंभीर यांची प्रतिक्रिया दखल घेण्याजोगी आहे. कर्णधारपदावर कोणाचाही हक्क नसतो, असे त्यांनी म्हटले.
विराटने कसोटी कर्णधारपद सोडतानाच्या मेसेजमध्ये, कॅप्टन्सी सोडण्याची योग्य वेळ, असे नमूद केले आहे. मात्र त्याची वेळ चुकली आहे. बॅडपॅच म्हणजे खराब फलंदाजी हेच नेतृत्व सोडण्यामागील विराटचे प्रमुख कारण आहे. आघाडी फळीतील या प्रमुख फलंदाजाने शेवटचे कसोटी शतक हे नोव्हेंबर २०१९मध्ये कोलकात्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात केले. त्यानंतरच्या १५ कसोटी सामन्यांतील १३ डावांमध्ये केवळ सहा अर्धशतके झळकावली आहेत. नेतृत्व सोडल्यानंतर तडाखेबंद फलंदाजी करणारा विराट सर्वांना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या नेतृत्वबदलाच्या संक्रमणातून जात आहे. झटपट क्रिकेटचा नियोजित कर्णधार रोहितच्या अनुपस्थितीत पाहुणा संघ दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका खेळणार आहे. त्याच्या जागी सलामीवीर लोकेश राहुल हा नेतृत्व करेल. दुसऱ्या कसोटीत कोहलीच्या गैरहजेरीत त्याला हंगामी कर्णधाराची जबाबदारी पार पाडावी लागली. कोहलीच्या निर्णयामुळे नेतृत्वाच्या सावळ्या गोंधळात आणखी भर पडली आहे. त्याचा परिणाम सांघिक कामगिरीवर होऊ शकतो.