नाशिक (प्रतिनिधी) : कोरोना सह ओमायक्रॉनचा वाढता प्रसार विचारात घेता शासनाने नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने पक्षीप्रेमी व पर्यटकांमध्ये घोर निराशा पसरली असून शासनाच्या देखील जवळपास साडे तीन लाख रुपयांच्या महसूलवर पाणी फिरले आहे.
कोरोना प्रादूर्भावामुळे मार्च 2019 पासून शासनाने सर्व आस्थापने बंद केली होती. अगदी तेव्हापासूनच नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य बंद करण्यात आले होते. मात्र कोरोना प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले केल्यानंतर आता पुन्हा कोरोना प्रादूर्भावामुळे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.
या हंगामात वनविभागाला जवळपास 2 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. तर हेच अभयारण्य मार्च पर्यंत सुरू राहिले असते तर आणखी तीन ते साडेतीन लाख रुपये महसूल जमा झाला असता. येथील निसर्गरम्य परिसर, ब्रिटीशकालिन धरण, पुरातन हेमाडपंथी मंदिरे, पक्षी अभयारण्य यामुळे येथे येणार्या देश-विदेशातील पर्यटकांची संख्या मोठी असते.विशेषत: हिवाळ्यात येथे देश-विदेशातील पक्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असल्याने पक्षी निरिक्षणासाठी या काळात पर्यटक मोठी गर्दी करतात. मात्र आता कोरोना प्रादूर्भावाचे कारण पुढे करून हे पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. आजच्या परिस्थितीत गर्दी होणारे बाजारपेठा, बाजार समित्या, शासकिय-निमशासकिय कार्यालये सुरू आहेत.
हॉटेल, बार, ढाबे देखील सुरू आहे. मात्र असे असतांनाही केवळ शाळा व पक्षी अभयारण्य बंद करण्याचा शासनाचा निर्णय हा शंका घेणारा ठरू लागला आहे. नांदूरमध्यमेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात अनेक वयोवृद्ध नागरिक फिरण्यासाठी येतात. मोकळी हवा, मन प्रसन्न करणारे वातावरण याबरोबरच परिसरास धार्मिक व पौराणिक महत्व असल्याने हा परिसर पर्यटकांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळत पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले ठेवणे गरजेचे होते.दरवर्षी या अभयारण्यात देश-विदेशातील हजारो पक्षी येथे दाखल होतात व हिवाळा संपताच पुन्हा आपल्या मायदेशी परत जातात. येथे स्थलांतरित पक्षांबरोबरच स्थानिक पक्षांंची संख्या देखील मोठी आहे. तर या अभयारण्याच्या भरवश्यावर येथे अनेक बेरोजगार तरुणांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. परंतु आता अभयारण्य बंद असल्याने हे व्यवसाय देखील कोलमडून पडले आहे.त्यामुळे या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाखो रुपये कर्जरूपी घेऊन अनेक तरूणांनी येथे हॉटेल, विश्रामगृह, मासे विक्री, किराणा दुकान, हॉटेल, पानटप-या असे छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. मात्र अभयारण्य बंद मुळे पर्यटक येत नसल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे.