नाशिक (प्रतिनिधी): शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असून घरोघरी रुग्ण आढळून येत आहे. परंतू बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने खरी आकडेवारी बाहेर येत नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या वतीने रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.
शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत ७३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसतं असले तरी घरोघरी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. २७ डिसेंबर २०२१ ते ११ जानेवारी या पंधरवड्यात शहरात ७३ टक्के कोरोना रुग्ण वाढले. जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत ७,६५१ रूग्ण आढळले. त्यातील ५ हजार ५९५ रूग्ण महापालिका हद्दीतील आहेत. महापालिका व खासगी रुग्णालये, लॅब तसेच आरोग्य केंद्रांवर तपासणीसाठी आलेल्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातात. त्यातून आकडेवारी बाहेर येते.मात्र, प्रत्यक्षात शहरात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. दर दोन ते पाच घरांत कोरोनाबाधित आढळून येत असल्याचा दावा महापौर कुलकर्णी यांनी केला. रुग्णांचा खरा आकडा बाहेर येण्यासाठी ही तपासणी मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या १५ दिवसांत झालेली ७३ टक्के रूग्णवाढ लक्षात घेता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याची गरज आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी उपाय योजने गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.
पंतप्रधान गतिशक्ती परिषदेचे करणार उद्घाटन
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आखलेल्या कृती योजना आणि प्रकल्प यांची माहिती देण्यासाठी मंत्रालय सोमवार 17 जानेवारी रोजी दक्षिण विभागासाठीच्या पंतप्रधान गतिशक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल पद्धतीने आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल.
परिषदेमध्ये महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, पुदुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणा हो राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी तसेच इतर भागधारकांच्या सहभागातून पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या विविध पैलूंवर तज्ञ व्यक्तींच्या पथकांच्या चर्चा होतील.
पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रम यशस्वी करण्यात राज्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. राज्य सरकारांशी समन्वय साधून, पायाभूत सुविधा उभारणाऱ्या सर्व मंत्रालयांना प्रकल्पांचे योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि वेळापत्रक निश्चित करण्यासाठी राज्य पातळीवर पंतप्रधान गतिशक्ती योजनेची संस्थात्मक चौकट निर्माण करणे आणि राज्यांना यासंदर्भातील योजनेचा नकाशा तयार करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यातूनच, या योजनेची कार्यक्षम अंमलबजावणी होईल आणि निश्चित कालावधीत प्रकल्प पूर्ण करता येतील.