मेलबर्न (वृत्तसंस्था) : सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोना प्रतिबंधक लसीकरण न करणे महागात पडले आहे. फेडरल कोर्टाने त्याचा व्हिसा रद्द करण्याचा सरकारी निर्णय कायम ठेवला. त्यामुळे जोकोविच हा ऑस्ट्रेलिया ओपनमधून बाहेर गेला आहे. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियात येण्यास त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
जोकोविचने कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्यामुळे संपूर्ण समुदायाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं मत मांडत ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉल यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी (१४ जानेवारी) घेतला होता. विक्रमी नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकणाऱ्या जोकोविचने देशाबाहेर काढण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. रविवारी फेडरल कोर्टाच्या तीन न्यायाधीशांनी जोकोविचच्या विरोधात निर्णय दिला आणि सार्वजनिक हिताच्या कारणास्तव व्हिसा रद्द करण्याचा मंत्र्यांचा निर्णय कायम ठेवला.
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ११ दिवसांपूर्वी मेलबर्न विमानतळावर पोहोचल्यानंतर जोकोविचला विमानतळावर काही तास थांबवण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियात प्रवेशासंबंधी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. कोर्टाच्या सुनावणी आधी जोकोविचला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यातही घेतले होते.
ऑस्ट्रेलियामध्ये लॉकडाऊनपासून लसीकरणापर्यंत कोरोनाविरोधात कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या अंतर्गत, कोणत्याही व्यक्तीला लसीकरण केल्याशिवाय ऑस्ट्रेलियात प्रवेश दिला जात नाही, जरी तो ऑस्ट्रेलियन नागरिक असला तरीही. महत्वाची गोष्ट म्हणजे विशेष परिस्थितीत आणि वैध कारणासह वैद्यकीय सवलत म्हणून लसीशिवाय प्रवेशास परवानगी दिली जात आहे.
आंतरराष्ट्रीय टेनिसमधील चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ स्पर्धेला सोमवारपासून (१७ जानेवारी) सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलियात येण्यास तीन वर्षांची बंदी
ऑस्ट्रेलियन न्यायालयाच्या निर्णयानंतर जोकोविचवर तीन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या इमिग्रेशन नियमांनुसार, संबंधित व्यक्ती तीन वर्षांपर्यंत ऑस्ट्रेलियात परत जाऊ शकत नाही. आता ऑस्ट्रेलियन सरकार जोकोविचला हा नियम लागू करेल की, त्याला सूट देईल, याबाबतची अधिक माहिती मिळालेली नाही. जोकोविचने अजूनही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले नाही आणि हद्दपार केले जात नाही, तोपर्यंत तो मेलबर्नमध्ये नजरकैदेत असेल.