Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडी

16 जानेवारी 'राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस'

16 जानेवारी 'राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस'
दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस देशात 'राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस' म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आज पंतप्रधान  मोदींनी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत, त्या सर्व स्टार्टअप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 150 स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. यामध्ये कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग 4.0, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी झाले होते. 150 हून अधिक स्टार्टअप्सची सहा कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली गेली होती. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश होता.
Comments
Add Comment