Thursday, June 19, 2025

नवी मुंबईतील दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्राच्या कालावधीत वाढ

नवी मुंबईतील दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्राच्या कालावधीत वाढ

नवी मुंबई (प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र प्रणालीद्वारे विहित वेळेत मिळण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती; परंतु दिव्यांग व्यक्तींचा ओळखपत्राला वाढता प्रतिसाद पाहून अजून सात दिवस वाढविले असल्याची माहिती अपंग शिक्षण प्रशिक्षण सेवा सुविधा केंद्राच्या मनपा संचालिका डॉ. वर्षा भगत यांनी दिली.



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी वैश्विक ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. यामागे दिव्यांग योजना घेताना या ओळखपत्राचा वापर सहजरित्या करता येईल, हा त्यामागे उद्देश होता. त्या शासन निर्णयाला अनुसरून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशाने १० ते १४ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ नवी मुंबई क्षेत्रात वास्तव्य करणारी दिव्यांग मुले व व्यक्तींना त्यांचे वैश्विक ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी मनपाच्या ईटीसी उपकेंद्र ऐरोली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते; परंतु नियोजित वेळ अपुरी व वाढता प्रतिसाद पाहता वेळेत बदल करून आता २१ जानेवारीपर्यंत कालावधी वाढविण्यात आला आहे.



प्रत्येक दिवशी मर्यादित जागा असल्या कारणाने विविध संस्थेमध्ये शिक्षण व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. मनपा क्षेत्रातील वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींचे वैश्विक ओळखपत्र संगणकीय नोंदणी करण्यासाठी व ओळखपत्र मिळण्यासाठी समाजसेवक राजेंद्र नवघरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ईटीसीकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment