मुंबई (प्रतिनिधी): मुंबईत नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, गेल्या तीन – चार दिवसांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मुंबईत शुक्रवारी ११हजार ३१७ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या जवळपास २ हजारांनी घटली आहे. मुंबई महापालिकेने २४ तासांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ९, ८१, ३०६ झाली आहे. तथापि, असे असले तरी ८४ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.
मुंबईत गुरुवारी १३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत शुक्रवारी जवळपास २ हजार रुग्ण कमी नोंदवले गेले आहेत. काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी होत आहे. गेल्या चार दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या २०७०० वरून ११ हजारांवर आली आहे. त्यामुळे करोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
मुंबईत शुक्रवारी बरे झालेल्यांची संख्या २२०७३ इतकी आहे. त्यामुळे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. आतापर्यंत ८,७७, ८८४ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ९५,१२३ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी शहरात ९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
८४ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत
मुंबई महापालिकेने गुरुवारी मागील २४ तासांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार, नवीन बाधितांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक होते. २०,८४९ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. रिकव्हरी रेट ८८ टक्क्यांवर पोहोचला होता. मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण ९५१२३ इतके आहेत. तर, दुपटीचा दर हा ३६ दिवसांवर आला आहे.
देशभरात २४ तासात अडीच लाखांहून जास्त बाधितांची नोंद
देशभराती करोना संसर्गाची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. याशिवाय करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रूग्णही आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही दररोज भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून करोना संसर्गाचा अधिक प्रमाणात प्रसार झालेल्या राज्यांना विशेष सूचना देखील दिल्या गेल्या आहेत.मागील २४ तासांमध्ये देशभरात अडीच लाखांहून जास्त म्हणजे २ लाख ६४ हजार २०२ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या कालच्या रूग्ण संख्येच्या तुलनेत ६.७ टक्के अधिक आहे. याशिवाय ५ हजार ७५३ ओमायक्रॉनबाधितही आढळलेले आहेत.
तसेच, याच काळात देशभरात १ लाख ९ हजार ३४५ रूग्ण करोनामुक्त देखील झाल्याचे समोर आले आहे. सध्या देशात १२ लाख ७२ हजार ७३ अॅक्टीव्ह केसेस असून, पॉझिटिव्हिटी रेट १४.७८ टक्के आहे.त्याशिवाय देशात मागील २४ तासात ३१५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झालेला असून, आजपर्यंत एकूण ४,८५,३५० करोनाबाधित रूग्णांचा देशभरात मृत्यू झालेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.