गौसखान पठाण
सुधागड-पाली : पालीतील अंबा नदी पुलाजवळ नदीपात्रात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या व मासळी टाकलेली आढळली. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे अंबा नदीचे पाणी दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही मासळीवाले व चिकन व्यावसायिक न विकला गेलेला माल आणि सडलेली मासळी आणि मेलेल्या कोंबड्या रात्री नदीत फेकून देतात. सध्या नदीचे पाणी वाहते नाही. बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे. परिणामी या मेलेल्या कोंबड्या व मासळी नदीपात्रात तिथेच पडून राहते व ते सडल्यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पालीकरांना पुरविले जाते. परिणामी रोगराई पसरण्याचा धोका देखील आहे.
नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेतली पाहिजे. जे कोणी असा प्रकार करत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
– मंगेश यादव, जिल्हा अध्यक्ष, लोककल्याण
ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य