Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमी...अन्यथा वेंगुर्ले रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सोमवारपासून बंद

…अन्यथा वेंगुर्ले रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सोमवारपासून बंद

अधिपरिचारिकांचा आंदोलनाचा इशारा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथील औषधनिर्माण अधिकारी दिनेश राणे यांची प्रशासकीय बदली वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे झालेली आहे, मात्र त्यांना अद्यापपर्यंत कार्यमुक्त केलेले नाही. तरी त्यांना त्यांच्या पदावर तत्काळ रुजू करावे अन्यथा सोमवारपासून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची सेवा बंद होणार असल्याचे पत्र अधिपरिचारिकांनी आरोग्य सहसंचालकांना लेखी स्वरूपात दिले आहे.

रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी हे पद रिक्त असल्याने अधिपरिचारीकांजवळ औषधनिर्माण अधिकारी यांचा कार्यभार दिलेला आहे. त्यामुळे रुग्णपत्रक काढणे, औषध वितरीत करणे ही कामे अधिपरिचारीकांना करावी लागतात, पण ती त्यांच्या कर्तव्यामध्ये येत नाहीत. अधिपरिचारीकांना त्यांच्या नेमून दिलेल्या रुग्णसेवेसंबंधीच्या कामाव्यतिरिक्त कोणतेही काम सोपविण्यात येऊ नये, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. मात्र, सदर पदावर कार्यभार सांभाळणाऱ्या अधिपरिचारिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही परिचारीका सदरचा कार्यभार सांभाळण्यास तयार नाही.

याला वेंगुर्ले येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल मुळे यांनी दुजोरा दिला असून त्यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग व आरोग्य सहसंचालक कोल्हापूर यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान अधिपरीचारिका यांच्या आंदोलनामुळे वेंगुर्ले रुग्णालयाची गैरसोय होणार आहे. तरी या संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक काय निर्णय घेतात, त्यावरच रुग्णसेवा बंद होणार की नाही ते ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -