वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) भारताला कोरोना व्हायरसवरून गंभीर इशारा दिला आहे. यूएनच्या रिपोर्टनुसार, भारतात गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे २ लाख ४० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराचा आर्थिक परिस्थितीवरही परिणाम झाला. भारत पुन्हा एकदा त्याच धोक्याकडे वाटचाल करत असून पुन्हा तीच परिस्थिती भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे भारताने भ्रमात राहण्याची गरज नाही, असा इशारा यूएनने दिला आहे.
‘ग्लोबल इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स’ (WESP) फ्लॅगशिप रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या अतिसंक्रामक ओमायक्रॉन स्वरूपामुळे संसर्गाची नवीन लाट सुरू झाली आहे. त्यामुळे या साथीचा पुन्हा एकदा आर्थिक परिस्थिती आणि मानवांवर परिणाम होऊ शकतो.
जागतिक सहकार्याशिवाय महामारीचा सामना करणे अशक्य आहे. युनायटेड नेशन्सचे आर्थिक आणि सामाजिक प्रकरणांचे अंडर-सेक्रेटरी जनरल लिऊ झेनमिन म्हणाले की, जागतिक सहकार्याशिवाय कोविड-१९ चा सामना करणे शक्य नाही. जोपर्यंत ही लस सर्वांपर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत हा सर्वात मोठा धोका राहील.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी सर्वांपर्यंत लस पोहोचली नाही तर कोरोना महामारी अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर संकट बनून राहणार आहे. सोबतच दक्षिण आशियाला पुढेदेखील मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते. या ठिकाणी कोरोना लसीकरणाचा वेग खूप कमी आहे. यामुळे नवनवीन व्हेरिअंटचा प्रकोप वाढतच राहणार आहे.
अमेरिकेत ओमायक्रॉन प्रकाराने उग्र रूप धारण केले असतानाच संयुक्त राष्ट्राचा हा अहवाल समोर आला आहे. परिस्थिती अशी झाली आहे की अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत आणि व्हाईट हाऊसला अनेक प्रांतांत सैन्य मागे घ्यावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १,४२,३८८ रुग्णांना अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परिस्थिती अनियंत्रित पाहून राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी मिशिगन, न्यू जर्सी, न्यू मेक्सिको, न्यूयॉर्क, ओहायो आणि रॉड आयलंड येथील रुग्णालयांच्या मदतीसाठी सैन्य पाठवले आहे.