
नवी दिल्ली: करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत असलेल्या धोरणात केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता केवळ तीन दिवसांतच रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. याबाबत आज केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य विभागाने बुधवारी देशातील कोविड स्थितीबाबत पत्रकार परिषदेत तपशील दिला. यावेळी कोविड बाबत सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांची माहितीही देण्यात आली. कोविडची सध्या जी स्थिती आहे त्याचा आढावा घेण्यात आला. त्यातून रुग्णांची तीन प्रकारांत विभागणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
सौम्य, मध्यम आणि गंभीर असे हे तीन प्रकार असतील. त्याचवेळी करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबतचेही धोरण बदलण्यात येत आहे. त्यानुसार करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सलग तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असे मानले जाईल. त्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता असणार नाही, असे अगरवाल यांनी नमूद केले. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णालाही तीन दिवस ताप आला नाही आणि ऑक्सीजन सपोर्टशिवाय त्याची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेवल ९३ टक्केपेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज देता येईल. या रुग्णाचीही पुन्हा करोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. रुग्णालय व होम आयसोलेशन अशा दोन्हींसाठी हा नियम असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. गंभीर रुग्णाला सतत ऑक्सीजनची गरज भासत असेल. त्याची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेवल अपेक्षित नसेल तर उपचारांमध्ये खंड पडू देऊ नये. यात सुधारणा झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज देता येईल, असेही नमूद करण्यात आले.