नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा वेग असाच वाढत राहिला तर तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात कळस गाठण्याची शक्यता आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सचिव डॉ. रवी मलिक यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सध्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था सुरू आहे. ओमायक्रॉन हा कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा कमी घातक आहे. हा नवा विषाणू फुप्फुसांवर नव्हे तर श्वसनमार्गाला अधिक संसर्ग करतो. त्याची लक्षणे सौम्य असली तरी आपण योग्य ते उपचार करून घेतले पाहिजेत. ओमायक्रॉनमध्ये देखील भविष्यात आणखी परिवर्तन होणार आहे. कोणतीही साथ ही तीन ते चार लाटांनंतर संपुष्टात येते, असा आजवरचा इतिहास आहे. मात्र कोरोनाचे नवनविन व्हेरिएंट वैद्यकीय तज्ज्ञांसाठी आव्हान ठरत आहेत.
डॉ. रवि मलिक म्हणाले की, कोरोना संसर्गाविषयी साऱ्या जगालाच नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. कोरोना विषाणूचे आणखी काही नवे प्रकारही संसर्ग फैलावू शकतात. त्यामुळे ही साथ कधी संपुष्टात येईल याबद्दल आताच काही सांगणे योग्य नाही, असे ते म्हणाले.