मुंबई : ज्या व्यक्तींनी Covid-19 प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण केले आहेत, त्यांना आजपासून (सोमवारी) संरक्षित (बूस्टर) डोस (Booster Dose) दिला जाणार आहे. हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील को-मॉर्बिड व्यक्तींना तो डोस दिला जाणार आहे. कोरोना बाधित रुग्णाला तीन महिन्यांनंतरच बूस्टर डोस दिला जाईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
संरक्षित लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने दोन्ही डोस घेऊन किमान ३९ आठवड्यांचा कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. दोन्ही वेळी जी लस टोचली आहे, त्याच लसीचा डोस घेणे बंधनकारक आहे. कॉकटेल डोस देण्यास अजूनही सुरवात झालेली नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी लसीची वर्धक मात्रा सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी महापालिका परिसरातील कोविड कंट्रोल रूममध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील नागरी आरोग्य केंद्रामध्ये, रेल्वे हॉस्पिटल, विमा रुग्णालय, एसआरपीएफ कॅम्प व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १८ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच त्या ठिकाणी ऑनलाइन व ऑन द स्पॉट बूस्टर डोस देण्याचीही सोय करण्यात आली आहे.
दरम्यान, पूर्वीचे डोस घेताना ज्या मोबाईल क्रमांकावरून नोंदणी केली आहे, तोच क्रमांक सांगावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन डोस घेतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेला असल्यास त्यास तीन महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जाणार आहे. तर ६० वर्षांवरील को-मॉर्बिड व्यक्तींना बूस्टर डोस घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांची संमती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे नाही. दरम्यान, बूस्टर डोस घेतल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दीत न जाणे व हाताची स्वच्छता राखणे हे नियम पाळावेच लागतील.