नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून रविवारी दिवसभरात १ लाख ७९ हजार ७२३ कोरोनाचे रुग्ण आढळले. तर २४ तासात १४६ जणांचा मृत्यू झाला. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ७ लाख २३ हजार ६१९ इतकी आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट १३.२९ टक्के इतका झाला आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग जास्त आहे. त्याचेही रुग्ण देशात झपाट्याने वाढत आहेत. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ४ हजार ३३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉन बाधितांची संख्या असून त्याखालोखाल दिल्ली आणि गुजरातमध्ये रुग्ण आहेत.
ओमायक्रॉनचा उद्रेक देशभरात वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक तयारीचा तपशील जाणून घेतला. जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा पोहोचविण्यावर भर द्यावा, बालकांच्या लसीकरण वेगाने केले जावे अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत. आजपासून देशात बूस्टर डोस देण्यात येत आहे.