सुधागड-पाली : पत्रकार दिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी पाली तहसील कार्यालयात सुधागड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी तहसिलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे व नायब तहसीलदार दिलीप कोष्टी यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या व त्यांना सन्मानित केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तिसरा डोळा आहे, असे तहसिलदार दिलीप रायण्णावार यावेळी म्हणाले.
पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे म्हणाले की, ‘डिजिटल माध्यमाच्या युगात आजही पत्रकारिता प्रभावी ठरत आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून अनेक परिवर्तन घडवून आणतात, तर गटविकास अधिकारी विजय यादव म्हणाले की, ‘लोकांचे प्रश्न मांडण्याचे प्रशासनाच्या कामावर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करतात.’ ज्येष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी समाजातील पत्रकारांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच पत्रकार फक्त बातमी देऊन थांबत नाहीत, तर त्या बातमीचा पाठपुरावा करून प्रश्न सोडवितात. एखादी समस्या मार्गी लावण्यासाठी वेळप्रसंगी चळवळी व आंदोलनेदेखील करतात, असे देखील ओव्हाळ म्हणाले.
यावेळी जेष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ, अमित गवळे, सुधागड प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद भोईर, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय दळवी, मंगेश यादव, अमित गायकवाड, संदेश उतेकर, प्रशांत हिंगणे व चेतन वळंज आदी पत्रकार उपस्थित होते.