मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसह दादर, माहीम पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.
गुरुवारी धारावीत कोरोनाचे १०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत या ठिकाणी नव्या रुग्णांमध्ये २४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सध्या येथील पॉझिटिव्हिटी रेट ११ टक्के इतका आहे.
मुंबईतील धारावीत गेल्या महिन्यात कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनने शिरकाव केल्याने चिंतेत वाढ झाली होती. येथील ८० टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. जी/ उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त किरण दिगावकर यांनी सांगितले की, गुरुवारी येथील ९७० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ११ टक्के लोक पॉझिटिव्ह आले. याआधी ८ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक ९९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते.
धारावीला लागूनच असलेल्या दादर आणि माहीममध्ये कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होते आहे. गुरुवारी दादरमध्ये २२३ रुग्ण तर माहीममध्ये ३०८ नवीन रुग्ण आढळले आहेत.
दादर हे गर्दीचे ठीकाण आहे. या ठिकाणी रोज कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दिगावकर यांनी सांगितले की, जी/ उत्तर प्रभागात १६०० जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील ६३८ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट ४० टक्के आहे.