Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कोरोना

जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कोरोना नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असलेल्या भारती पवार यांचा यात समावेश असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती किती चिंताजनक आहे हेदेखील या निमित्ताने अधोरेखीत होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. आता तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही या प्रादुर्भावामुळे बाधित होत आहेत. नाशिक जिल्ह्याला भूषणावह असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार भारती पवार यांना देखील कोरोना महामारीची बाधा झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. विशेष म्हणजे भारती पवार यांच्या हस्ते १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ नाशिक शहरातील बिटको रुग्णालयात करण्यात आला होता. त्यानंतर त्या सुरत येथे दौऱ्याला गेल्या आणि नाशिक शहरातही त्यांनी भरगच्च कार्यक्रम केले होते. त्यामुळे आता अजून कोणाकोणाला बाधा झाली आहे का, याबाबत तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात विक्रम करणारे आणि लोकप्रिय असलेले खासदार हेमंत गोडसे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. मागील दोन दिवसांपासून ते देखील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत होते. ते मुंबईला व्यवसायिक बैठकांसाठी गेले होते. त्यापूर्वी शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment