नवी दिल्ली :भारतात होणाऱ्या एएफसी वुमेन्स एशियन कप इंडिया २०२२ स्पर्धेसाठी अनुभवी आणि गुणवान अशा महिला सामना अधिकाऱ्यांची (मॅच ऑफिशियल्स) नियुक्ती करण्यात आली आहे. यात रंजिता देवी टेकचाम (मुख्य पंच), फर्नांडिस उवेना (सहाय्यक) आणि रिबेलो मारिया पिएडाडे (तांत्रिक निरीक्षक) या तीन भारतीयांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी ३२ सामना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आशिया संयुक्त महासंघाशी (एएफसी) सलंग्न १५ संघटनांमधून १६ मुख्य आणि सहाय्यक पंचांची (रेफ्री) नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व सामना अधिकारी प्ले-ऑफसह स्पर्धेतील एकूण २९ सामन्यांत आपली भूमिका बजावतील.
‘फिफा’ महिला वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय उपखंडातील नऊ सामना अधिकाऱ्यांची निवड झाली होती. एएफसी वुमेन्स एशियन कप इंडिया स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान रंगणार आहे.