मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्याने शाळा बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत, तर विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या परवानगीप्रमाणे दहावीच्या शाळा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पूर्ण हजेरीवर परिणाम झाला असून संख्येने कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना शाळेत वेळेत पोहचावे लागते. त्यामुळे त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटने केली आहे.
सध्या अन्य वर्ग बंद असल्याने शिक्षकांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने शिकवण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. अशा वेळी प्रशासनाने शाळेत शिक्षकांची उपस्थिती संदर्भात निर्णय न घेतल्याने शिक्षकांत संभ्रम आहे. लांब प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांचा प्रवासात वेळही वाया जातो. शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने शाळेत विद्यार्थी येत नसल्याने शिक्षकांना संस्थेत न बोलवता वर्क फ्रॉम होम करण्याचा व संस्थेत एकाच वेळी उपस्थिती क्षमतेचा सहानुभूतीने निर्णय जाहीर करण्यात यावा, अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली आहे.