मुंबई : मुंबईच्या अग्रमानांकित आणि इंडिया कॅडेट ओम कदमने सहाव्या आयआयएफएल मुंबई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या ज्युनियर गटात एक फेरी बाकी असतानाच सलग ८ विजयांसह ८ गुणांची कमाई करीत जेतेपदावर आपल्या नावाची मोहोर उमटवली. कफ परेड येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेत ओमने आठव्या फेरीत रघुराम रेड्डीवर ५७ व्या चालीतच शानदार विजय मिळवत यंदाचे जेतेपद मिळवले. खुल्या गटात अर्जुन आदिरेड्डीने ६.५ गुणांची कमाई करीत आघाडी घेतली.
ज्युनिअर गटातील दुसऱ्या पटावर दुसऱ्या स्थानी असणारा गौरांग बागवे आणि जयवीर महेंद्रू यांच्यात अटीतटीची लढत झाली. दोघांनीही एकमेकांना शह- प्रतिशह देत लढतीत चुरस आणली. सिसिलिअन ओपनिंगचा वापर झालेल्या या लढतीत गौरांगने सातव्या चालीत जयवीरचे प्यादे मारले. पण जयवीरने अफलातून प्रतिहल्ला चढवत गौरांगच्या राजालाचा धोका निर्माण केला. त्यामुळे गौरांगला बरोबरी स्वीकारावी लागली. गौरांग आणि जयवीर या दोघांचेही ६.५ गुण झाले असून त्यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस आहे.
ओपन गटात तिसऱ्या पटावर खेळताना अर्जुन आदिरेड्डीने ५०व्या चालीत दर्शील काजरोळकरला पराभूत करीत शानदार विजय मिळवला. त्यानंतर अर्जुनने कालचा आघाडीवीर पूर्वीं अय्यरला बरोबरीत रोखत ६.५ गुणांसह आघाडी घेतली. त्याच्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, रचित गुरनानी, अरविंद अय्यर, रित्विक कृष्णन, ऋतुराज धोत्रे हे पाच बुद्धिबळपटू ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. या स्पर्धेची रंगत आता अधिकच वाढली आहे.