दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे, पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी सकाळी जिल्ह्यातील चंदगाम गावात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. दोन्ही बाजूंच्या चकमकीत एका पाकिस्तानीसह जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले. जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा हे मोठे यश असल्याचे यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले.
दक्षिण काश्मीरमध्ये सोमवारपासूनची ही दुसरी चकमक आहे. कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी ठार झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये कारवाई करण्याचे धाडस केले होते. याला सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलाच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता.