मुंबई : एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात समीर वानखेडे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुदत संपल्यानं त्यांची एनसीबीतून बदली करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकाळ संपल्यानंतर समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप (audio clip) ऐकवत समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) निशाणा साधला होता.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच, एनसीबीचे झोनल डायरेक्टर आयआरएस (Indian Revenue Service) अधिकारी समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ संपला आहे. 31 डिसेंबरनंतर त्यांना मुदत वाढ न मिळाल्यानं ते आपल्या आयआरएस केडरमध्ये परत जातील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरएस कस्टम आणि सेंट्रल एक्साईज असं केडर असलेले वानखेडे पुन्हा आपल्या खात्याच्या सेवेत रुजु होतील.