
पुणे: केंद्र सरकारने १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या वयोगटातील लसीकरण विक्रमी वेळेत आणि सुनियोजितपणे पूर्ण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवणे आवश्यक आहे. पालिकेने त्यासाठी पुढाकार घेऊन शाळा, महाविद्यालयात लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपाचे जिल्हा सहसंयोजक (विद्यार्थी विभाग) अनिकेत शेलार यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे, प्रकाश चौधरी, सुहास आढाव, रुबेन सनी, विक्रांत गंगावणे, तन्मय शेलार, तेजस मुळे, वरद जोशी आदी उपस्थित होते.
अनिकेत शेलार यांनी निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याचे जाहीर केले आहे. विद्यर्थ्यांचे लसीकरण हे विद्यालयात व महाविद्यालयात करण्यात यावे. यामुळे कोणत्या विद्यार्थ्याने लस घेतली आहे व कोणत्या विद्यार्थ्याने लस घेतली नाही, याबाबतची विद्यालयाकडे नोंद राहिल. तसेच लसीच्या कारणासाठी विद्यार्थ्यांचे सुट्टीचे प्रमाण कमी राहील.
महापालिकेने 'व्हॅक्सिनेशन ऑन व्हेहिकल' हा उपक्रम सुरू केला आहे. ही सुविधा विद्यालयात राबवण्यात आली तर लसीकरणाला गती मिळेल. जे पालक मुलांना लस देण्यास टाळाटाळ करतील, यानिमित्ताने त्या विद्यार्थ्याचे देखील लसीकरण होऊन जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विद्यालयात व महाविद्यालयात लसीकरण सुरू करण्यात यावे, असेही शेलार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.