नाशिक : व्हेज मंचुरियन खाल्ल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने चार युवकांनी दुकान मालकाच्या डोक्यात बाटली मारून दुकानाची तोडफोड केल्याची घटना नांदूर नाका येथे घडली.
फिर्यादी कुणाल कैलास वाघ (वय २४, रा. वृंदावननगर, नांदूर लिंक रोड, आडगाव) यांचे नांदूर नाका येथे एस. के चायनिज या नावाचे दुकान आहे. २६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दुकान बंद करीत असताना त्यांच्या ओळखीचे पद्माकर राजेंद्र विसपुते व आकाश राजू धोत्रे हे तेथे आले आणि त्यांनी त्यांच्याकडे खाद्यपदार्थांची मागणी केली. पण दुकान बंद करायची वेळ झाल्याने आता फक्त व्हेज मंचुरियन आहे, असे दुकानदाराने सांगितले. त्यांनी ते मान्य केल्यावर वाघ यांनी व्हेज मंचुरियन दिले आणि त्यांच्याकडे व्हेज मंचुरियनचे ५० रुपये मागितले असता त्याचा आरोपींना राग आला. त्या दोघांनी दुकानदारास शिवीगाळ करून आरोपींनी त्यांचे मित्र सनी राजू धोत्रे व राहुल श्याम क्षत्रिय (सर्व रा. जनार्दननगर, नांदूर नाका) यांना बोलावून घेतले. त्यांनी हातात तलवार व कोयता घेऊन फिर्यादीसोबत वाद घातला. राहुल क्षत्रिय याने त्याच्या हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारली. तसेच दुकानाची तोडफोड करून गल्ल्यातील ९ हजार ७०० रुपये काढून घेतले. या झटापटीत फिर्यादी वाघ यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन गहाळ झाली. या चौघांनी दुकानदारास मारहाण करून पळ काढला.
या प्रकरणी कुणाल वाघ यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.