नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन वेरियंट ओमायक्रॉनने चिंता (omicron) वाढवली आहे. देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या ही २०० वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि दिल्लीत आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही ५४ वर गेली आहे. यातील २८ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिल्लीतही एकूण रुग्णांची संख्या ही ५४ पर्यंत पोहोचली आहे. यातील १२ रुग्ण बरे झाले आहेत. तेलंगणमध्ये २० रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात १९ रुग्ण आढळले. त्यापैकी १५ जण बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये १८ रुग्ण आढळले आणि सर्वजण बरे झाले आहेत. केरळमध्ये १५, गुजरातमध्ये १४, उत्तर प्रदेशात २ रुग्ण आढळले आणि ते दोन्ही बरे झाले आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान, देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असताना एम्सचे संचाल डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशाने कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.
ब्रिटनमध्ये रविवारी एकाच दिवशी ओमायक्रॉनचे १० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. याचे उदाहरण देत डॉ. गुलेरिया यांनी इशारा दिला आहे. भारताने कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. ओमायक्रॉन वेरियंटसंदर्भात आपल्याला अधिक माहितीची गरज आहे, असे ते म्हणाले.
अमेरिका, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आपणही सतर्क राहणे गरजेचे आहे. आपण आधीपासूनच तयारी केल्यास हे समजदारीचे पाऊल असेल. आपण स्वतःला कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तयार ठेवले पाहिजे, असे डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.