Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीमाफी मागा, अन्यथा वठणीवर आणू...

माफी मागा, अन्यथा वठणीवर आणू…

हेमा मालिनींबाबत गुलाबरावांच्या वक्तव्यावर महिला नेत्या भडकल्या

अमरावती (वृत्तसंस्था) : शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनींच्या गालाशी केली. गुलाबरावांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी, ‘माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा’, असा इशारा दिला आहे. अशातच, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्हीडिओ शेअर करत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.

‘गुलाबराव पाटील यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या सुसंस्कृतपणाचा विसर पडला असून त्यांनी हे विधान मागे घेऊन तत्काळ माफी मागावी अन्यथा आम्ही आमच्या स्टाइलने त्यांना वठणीवर आणू’, असे म्हणत नवनीत राणा यांनी गुलाबराव यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या निमिताने राज्यातले वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. सेना उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत गुलाबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. पण यावेळी त्यांचा तोल जरासा ढळला. आपल्या मतदारसंघात आपण खूप चांगले रस्ते केले आहेत, हे सांगताना त्यांनी रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा दिली.

शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस

महाविकास आघाडीतल्या आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यावर टीका करणारे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना कारवाईचा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी पलटवार केल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत नव्याने धुसफूस सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले नेते एकनाथ खडसे यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत टीका करताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगावच्या रस्त्यांना ज्येष्ठ सिने अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांच्या गालांची उपमा दिली होती. ४० वर्षे आमदार राहिलेल्या नेत्याने आमच्या धरणगावात येऊन इथले रस्ते बघावेत. हेमा मालिनींच्या गालांसारखे रस्ते असले नाहीत, तर राजकारण सोडीन, असे पाटील म्हणाले. त्यावर पलटवार करताना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याबद्दल राज्य महिला आयोगाकडून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाही आहेत. गुलाबराव पाटील यांनी एखाद्या महिलेबाबत भाष्य करून अशोभनीय वक्तव्य केले आहे. त्यांनी याबद्दल त्वरित माफी मागावी, असे त्या म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -