
मुंबई :यंदा ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनवर महानगरपालिकेची नजर ठेवली जाणार आहे. गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ३१ डिसेंबरला सभागृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फक्त ५० टक्के क्षमतेनेच चालवण्याची अट घातली आहे.
१५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे बहुतांश लोकांना ‘थर्टी फर्स्ट’जोशात साजरा करता आला नव्हता. यंदा कोरोनाच्या निर्बंधांमध्ये थोडी सवलत दिल्याने सेलिब्रेशनचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसनी तयारीला सुरुवात केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात अनेक ठिकाणी गर्दी होणार हे गृहीत धरुन मुंबई महानगरपालिकेनेही धोरण आखले आहे.
‘थर्टी फर्स्ट’ निमित्त मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांवर पालिकेकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात पालिकेकडून दोन टेहळणी पथके तैनात केली जातील. वॉर्ड मोठा असल्यास आणि गरज पडल्यास चार पथके तैनात केली जातील. ही पथके सर्व ठिकाणी नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवून असतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.