Wednesday, April 30, 2025

देशमहत्वाची बातमी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ पोलिस शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ पोलिस शहीद

श्रीनगर (हिं.स.) : जम्मू-काश्मिरातील बांदीपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आज, शुक्रवारी जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन जवान शहीद झालेत. मोहम्मद सुल्तान आणि फैय्याज अहमद अशी या जवानांची नावे आहेत. तर आणखी दोन जवान या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यासंदर्भातील माहितीनुसार, बांदीपोरा येथील गुलशन चौक परिसरात आज, शुक्रवारी जिहादी दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. यात चार जवान जखमी झालेत. जखमी जवानांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी सुल्तान आणि फैय्याज अहमद यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर दोन जवानांवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत या हल्ल्याची निंदा केली. तसेच शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली.

यापूर्वी सुरक्षा दलांनी गेल्या ८ डिसेंबर रोजी शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. शोपियानच्या चक-ए-चोला गावात दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहिम हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. तर जवानांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात आमिर हुसैन, रईस अहमद आणि हसीब युसूफ हे तीन दहशतवादी ठार झाले होते.

Comments
Add Comment