मुंबई : राज्यातील बहुसंख्य डास प्रतिबंधक अगरबत्त्या या अवैध असून आवश्यक ते प्रमाणपत्र/परवाना त्यांच्याकडे नसल्यामुळे होम इंन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) ने महाराष्ट्रात डास प्रतिबंधक अगरबत्त्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. होम इंन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) हे ना-नफा तत्वावर चालविण्यात येणारे औद्योगिक मंडळ भारतात घराघरांमध्ये कीटकनाशकांचा सुरक्षीत वापर करण्याबाबत जनजागृती करते.
देशात कोव्हीड-१९ महामारीमुळे श्वसनविषयक विकारांचे प्रमाण वाढले असून काही रुग्णांमध्ये ठराविक प्रमाणात तर काहींच्या बाबतीत संपूर्ण फुफ्फुसे निकामी झाली आहेत. जगभरातील वैद्यकीय तज्ञ आधीपासूनच आरोग्याबाबत निर्माण झालेली ही आपत्ती नियंत्रणात आणण्याच्या कामात गुंतलेले आहेत.
अलिकडच्या सरकारी माहितीनुसार, देशभरात गेल्या एक महिन्यात १,१६,९९१ डेंग्युच्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, हरयाणा, केरळ, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि नवी दिल्ली या राज्यांमध्ये डेंग्युच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
लोकांना डासांपासून स्वतःचा बचाव करायचा असतो आणि त्यासाठी जवळच्या केमिस्ट, पानवाला किंवा किराणा मालाच्या दुकानातून ते डास प्रतिबंधक अगरबत्त्या खरेदी करतात. या अगरबत्त्या स्वस्तात विकल्या जातात आणि जरी त्यामुळे डासांचे प्रमाण कमी झालेले दिसून येत असले तरी त्या अवैधरीत्या बनवलेल्या असतात आणि संबंधित सरकारी विभागाकडून योग्य परवाना आणि परवानगी न घेता त्यांची विक्री केली जाते. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या बेकायदेशीर आणि बनावट अगरबत्त्यांमध्ये मान्यता नसलेल्या घातक रसायनांचा (कीटकनाशक) वापर केलेला असतो. यामुळे अस्थमा, ब्रॉंकायटिस, श्वसनमार्गाशी संबंधित आजार आणि श्वसनविषयक विकार उद्भवू शकतात. सगळ्या घरी वापरण्यासाठीच्या कीटकनाशक उत्पादकांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सुरक्षाविषयक मापदंडाची मूलभूत तपासणी किंवा त्यांचा अवलंब या बेकायदेशीर अगरबत्त्यांचे उत्पादन करणाऱ्यांकडून केला जात नाही.
डास प्रतिबंधक अगरबत्त्या बाजारात रिलॅक्स, कम्फर्ट, स्लीपवेल, जस्ट रिलॅक्स, रिलीफ, नॅचरल रिलॅक्स अशा अनेकविध नावांनी विकल्या जातात. या अगरबत्त्या व्यवस्थित नियामक उत्पादन आणि परवाना प्रक्रियेतून गेलेल्या नसतात. कीटकनाशक कायदा १९६८ मधील तरतुदीनुसार सर्व घरगुती कीटकनाशक उत्पादनांना केंद्रीय कीटकनाशक मंडळाची (सीआयबी) आणि नोंदणी समितीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. परवानगी मिळण्याआधी त्या उत्पादनातील विषारीपणा आणि ग्राहक आणि प्राण्यांची सुरक्षितता यांचे परीक्षण केल्यानंतरच सीआयबी कडून घरगुती वापराच्या कीटकनाशक उत्पादनांना मान्यता मिळते.
एचआयसीएचे मानद सचिव जयंत देशपांडे म्हणाले, “ज्यावेळी वरचेवर श्वसनाच्या आजारांचा त्रास होऊ लागतो तेव्हा आम्ही लोकांना डास प्रतिबंधक अगरबत्त्यांचा वापर थांबविण्याचा किंवा टाळण्याचा आग्रह करतो. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश अगरबत्त्या बेकायदेशीर असून ग्राहकांच्या आरोग्यावर त्यांचा वाईट परिणाम होतो. माहित नसलेल्या अज्ञात ज्वलनशील पदार्थांसह बनविलेल्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांच्या वापरामुळे अस्थमा, ब्रॉंकायटिस, श्वसनमार्गाशी संबंधित आजार आणि श्वसनविषयक विकार बळावतात. या अगरबत्त्या योग्य त्या नियामक तपासणीतून गेलेल्या नसतात आणि प्रमाणित केलेल्या पातळीपेक्षा त्यांच्यामध्ये रसायनांचे प्रमाण जास्त असते. मान्यता नसलेल्या किंवा बंदी असलेल्या रसायनांचा वापरही यात झालेला दिसून येतो. या अगरबत्त्यांमुळे डासांच्या त्रासावर प्रभावी परिणाम दिसून येत असला तरी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही त्या तितक्याच घातक आहेत.”