कणकवली :एक महिन्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एसटी बस रस्त्यावर धावली. कणकवली ते सावंतवाडी अशी फेरी सुरू करून प्रवाशांना सेवा दिली गेली.
विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने सर्वच फेऱ्या गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. त्यात सोमवारी कणकवली आगारातून दुपारी २.१५ वाजता कणकवली सावंतवाडी बस ४ प्रवाशांना घेऊन सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून काही मोजकेच कर्मचारी कामावर आले आहेत. चोख पोलीस बंदोबस्त ठेवत कणकवली ते सावंतवाडी अशी एसटी बस आगारातून रवाना झाली. त्यासाठी चालक वाहक म्हणून प्रमोशन मिळालेल्या कर्मचाऱ्यांना ड्युटी देण्यात आली.
यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, विभागीय वाहतूक अधिकारी मोहन खराडे, कामगार अधिकारी एल.आर.गोसावी, सुरक्षारक्षक अधिकारी भानुदास मदने व चालक कासले उपस्थित होते.