Share

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर

भारतीय घटनेचे शिल्पकार आणि जगातील कोटी-कोटी गोरगरीब, दलित व उपेक्षित जनतेचे दैवत असलेल्या महामानवाचा देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता, यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्यासाठी प्राण देणारी त्यांची लक्षावधी लेकरे देशाच्या कानाकोपऱ्यांत आहेत. त्यांच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी असलेले लक्षावधी तरुण तेव्हाही होते. बाबासाहेब म्हणजे सर्वस्व मानणारे लोक घराघरांत असताना त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, हे ऐकतानाही ज्यांनी त्यांचा पराभव केला, त्यांच्याविषयी संताप आणि घृणा आजही वाटते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१-५२मध्ये झाली. पंडित जवाहरलाल नेहरू हेच पंतप्रधान होणार, हे स्पष्ट होते. संसदीय लोकशाहीचा पहिला मोठा उत्सव म्हणून या निवडणुकीकडे बघितले गेले. तेव्हा देशात १७ कोटी ६० लाख मतदार होते. ६१ टक्के मतदान झाले. लोकसभेच्या ४८९ पैकी ३६४ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला ४५ टक्के मते मिळाली होती. पंडित नेहरूंची लोकप्रियता हेच त्या यशामागचे प्रमुख कारण होते.

पण १९५२च्या पहिल्या निवडणुकीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबईत पराभव झाला, हे कमालीचे धक्कादायक होते. शेड्युल कास्ट फेडरेशनचे उमेदवार म्हणून बाबासाहेबांनी उत्तर-मध्य मुंबईतून ही निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. खरे तर काजरोळकर हे बाबासाहेबांचे अनेक वर्षे सहायक होते, सोशल सर्व्हिस लिगच्या आॅफिसमध्ये ते बसायचे. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली व बाबासाहेबांचा पराभव घडवून आणला. पंडित नेहरूंच्या लोकप्रियतेच्या लाटेत काजरोळकर हे अकरा हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. राखीव मतदारसंघात नारायण काजरोळकर यांना १ लाख ३४ हजार १३७ मते मिळाली, तर बाबासाहेब आंबेडकर यांना १ लाख २३ हजार ५७६ मते पडली. काजरोळकर यांना मिळालेली ६ हजार ४९२ मते बाद झाली, तर बाबासाहेबांना मिळालेली ६२ हजार २१ मते बाद झाली. सर्वाधिक बाद मते नेमकी आंबेडकरांचीच कशी हे गूढ होते. विशेष म्हणजे हिंदू महासभेचे केशव बाळकृष्ण जोशी हे अपक्ष म्हणून सर्वसाधारण मतदारसंघातून रिंगणात होते, मतदानाच्या तीन दिवस अगोदर त्यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले व राखीव मतदारसंघासाठी आंबेडकरांना मतदान करावे, असे आवाहन केले. मग त्यांच्या अनुयायांच्या दुसऱ्या मतांचा काहीच लाभ बाबासाहेबांना झाला नाही का? राखीव मतदारसंघात बाबासाहेब आंबेडकर होते व सर्वसाधारण मतदारसंघात अशोक मेहता होते. समाजवादी पक्षातील मतदारांनी अशोक मेहता यांना जेवढे मतदान केले, किमान तेवढी मते मिळाली असती तरी बाबासाहेबांचा विजय झाला असता. पण काँग्रेस काय किंवा समाजवादी काय, कोणीच बाबासाहेबांना मतदान केले नसावे.… सर्वधासाधारण मतदारसंघात अशोक मेहता यांना तेव्हा १ लाख ३९ हजार ४७१ मते मिळाली, तर कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे यांना ९६ हजार ७५५ मते मिळाली. काँग्रेस, समाजवादी किंवा कम्युनिस्ट पक्षाने त्यांचे दुसरे मत राखीव जागेसाठी आंबेडकरांना द्यावे, असे सांगितले नाही. उलट दुसरे मत कुजविण्यात आले, हे सुद्धा बाबासाहेबांच्या पराभवाचे एक कारण असू शकते.

बाबासाहेबांच्या मुंबईत झालेल्या पराभवानंतर आंबेडकरी जनतेत काँग्रेसविषयी ‌द्वेष वाढू लागला. बाबासाहेबांचा पराभव आंबेडकरी जनतेच्या जिव्हारी लागला. ज्यांनी निर्माण केलेल्या संविधानावर निवडणूक झाली, त्यांनाच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, हे धक्कादायक होते. प्रकांड पंडित आणि दलितांचे कैवारी असलेल्या बाबासाहेबांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, हे शल्य आजही आंबेडकरी जनता आणि त्यांचा आदर करणारे सर्व जाती, धर्म, पंथांतील लोक विसरू शकत नाहीत.

भंडारा येथील लोकसभा पोटनिवडणूक ७ मे १९५४ रोजी झाली. ही निवडणूक बाबासाहेबांनी लढवावी व मुंबईच्या पराभवाचे उट्टे काढावे, असा आग्रह तेथील आंबेडकरी जनतेने केला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसबरोबर कदाचित समझोता होऊ शकला असता, पण बाबासाहेबांनीच तडजोडीला विरोध केला. राखीव जागेसाठी काँग्रेसने भाऊराव बोरकर यांना उमेदवारी दिली. बाबासाहेबांना ज्या भागात जास्त मतदान होण्याची शक्यता आहे, तेथे मतदारांची नावे गायब करण्यात आली.

गोंदिया व भंडारा सर्कलमध्ये चार ते सहा हजार मतदारांची नावे काढली गेली. मतदार यादीत अनेकांची नावे हाताने खोडलेली होती. जागरूक मतदारांनी आपली नावे पुन्हा याद्यांत समाविष्ट करून घेतली; परंतु प्रयत्न तोकडे पडले. १९५४च्या पोटनिवडणुकीतही बाबासाहेबांचा पराभव झाला, पण निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी आपला नितीमत्तेचा ठसा उमटवला. या निवडणुकीच्या निकालानंतर विजयी कोण झाला, यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पराभवाची चर्चा अधिक झाली. निवडणूक प्रचारात बाबासाहेबांनी रोखठोक भाषणे केली. पं. नेहरूंच्या भूमिकेवर व धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. या निवडणुकीत सर्वसाधारण जागेसाठी काँग्रेसकडून पूनमचंद रांका व राखीव जागेवर भाऊराव बोरकर होते. त्यांच्याविरोधात सर्वसाधारण जागेवर प्रजा समाजवादी पक्षाचे अशोक मेहता व राखीव जागेवर शेड्युल कास्ट फेडरेशनतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांनी लढत दिली.

निवडणूक काळात अशोक मेहता यांचे खासगी सचिव डाॅ. शांतीलाल व निवडणूक प्रचारप्रमुख ज्वालाप्रसाद दुबे यांनी बाबासाहेबांची भेट घेतली. शेड्युल कास्ट फेडरेशनच्या मतदारांचे दुसरे मत अशोक मेहतांना मिळावे व प्रजा समाजवादी पक्षाच्या मतदारांचे दुसरे मत बाबासाहेबांना मिळावे, असा समझोता सुचविण्यात आला. आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणाले, शेड्युल कास्ट फेडरेशनचे दुसरे मत मेहतांना मिळेल. पण प्रजासमाजवादी पक्षाचे दुसरे मत आपल्याला मिळण्याची शक्यता नाही, म्हणून समझोता करू नये. फेडरेशनच्या मतदारांनी आपले दुसरे मत गोठवून टाकावे, कोणालाही देऊ नये….

बाबासाहेब म्हणाले, मी राज्यघटना बनवली आहे. मत गोठवणे, हे घटना विरोधी आहे. माझेच अनुयायी घटना नीतिमूल्यांच्या विरोधात कार्य करतील, ते योग्य होणार नाही. मी निवडणूक हरलो तरी चालेल, पण तुमचे म्हणणे ऐकणार नाही….

या निवडणुकीत काँग्रेसचे बोरकर यांना १ लाख ४० हजार ८३६ मते मिळाली व बाबासाहेबांना १ लाख ३२ हजार ४८३ मते पडली. बाबासाहेबांचा ८,३५६ मतांनी पराभव झाला. बाबासाहेब हरले, पण नीतिमत्तेचा धडा देऊन गेले…. देशाचे पहिले कायदेमंत्री, राज्यसभा सदस्य, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव होतो, हे शल्य आजही कायम आहे.
sukritforyou@gmail.com

Recent Posts

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

6 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

17 minutes ago

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता… पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…

25 minutes ago

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…

34 minutes ago

Saifullah Khalid : पहेलगाम हल्ल्यामागील मास्टरमाइंड सैफुल्लाह खालीद नक्की कोण आहे?

जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…

36 minutes ago

Pahalgam Attack Impact: पहलगाम हल्ल्याचा असाही फटका! माता वैष्णवदेवीच्या भाविकांची संख्या घटली

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…

36 minutes ago