मुंबई (प्रतिनिधी) : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली आहे. यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस विलगीकरणात राहायचे आहे. तसेच दिवसातून पाच वेळा फोन वरुन संपर्क करायचा आहे. तर पालिकेचे पथक प्रत्यक्ष घरी भेट देऊन खात्रीही करणार आहे. यासाठी पालिका सॉफ्टवेअरही तयार करणार आहे.
दरम्यान गृहविलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यावर फौजदारी व न्यायालयीन कारवाई देखील केली जाणार आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबत शनिवारी एसओपी जाहीर केली असून विमानतळापासून आरोग्य सेविकांपर्यंत जबाबदारी दिली आहे. गृहविलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.