देवरूख (प्रतिनिधी) : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील एसटी फेऱ्या बंद आहेत. या संपाचा फटका रत्नागिरीत येणाऱ्या कामगार वर्गाला, शासकीय कर्मचाऱ्यांना बसत आहे. काही एसटी कर्मचारी कामावर रूजू होत असल्याने रत्नागिरी-देवरूख मार्गावर सकाळ, संध्याकाळी फेऱ्या सोडाव्यात अशी मागणी रत्नागिरीत कामाला येणाऱ्या कामगार वर्गातून होत आहे.
मागील महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्याचा फटका कामगार वर्गाला व शासकीय कर्मचाऱ्यांना बसत आहे. देवरूखमधून रत्नागिरीत शेकडो कर्मचारी दररोज कामासाठी येत असतात. परंतु महिनाभर एसटी बंद असल्याने अनेकांच्या येण्याजाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक महिला, मुलींवर नोकरी सोडण्याची वेळ आली आहे. सामान्यांना खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नाही. अनेकांकडे वाहनांची सोय नाही, अशा कामगारांना नोकरी सोडावी लागली आहे. महिनाभर काम हुकल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरे चालवायची कशी? कुटुंबाचे पोट भरायचे कसे? असा प्रश्न कामगार वर्गासमोर निर्माण झाला आहे.
अनेक शासकीय कर्मचारी देवरूखमधून रत्नागिरीला येतात. खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणारे शेकडो कामगार देवरूखमधून दररोज रत्नागिरीला येत असतात. मात्र एसटी बंद असल्याने या कामगार वर्गाचे हाल झाले आहेत. वडाप सुविधा या मार्गावर उपलब्ध नाही. त्यामुळे देवरूखमधून रत्नागिरीत येणे अशक्य बनले आहे. देवरूख-रत्नागिरी अंतर सुमारे ५० किमी असल्याने खासगी वाहनाने प्रवास करणे त्रासदायक ठरते.