Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रठाणे५०० चौरस फूट घरांच्या करमाफीचा प्रस्ताव म्हणजे शिवसेनेची बनवाबनवी

५०० चौरस फूट घरांच्या करमाफीचा प्रस्ताव म्हणजे शिवसेनेची बनवाबनवी

आमदार संजय केळकर यांचा आरोप

ठाणे (वार्ताहर) : शिवसेनेने मागील निवडणुकीत शहरातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचे आश्वासन ठाणेकरांना दिले होते. मात्र, करमाफीचा प्रस्ताव म्हणजे निव्वळ शिवसेनेची बनवाबनवी असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

साडेचार वर्षे उलटली तरीही प्रत्यक्षात हे आश्वासन साकारता आले नाही, त्यामुळे शिवसेनेने मतांसाठी नागरिकांची केलेली ही फसवणूकच असून, याची जाणीव ठाणेकरांना आहे. आगामी निवडणुकीत सर्वसामान्य मतदार त्यांना योग्य धडा शिकवतील, असा टोला आमदार केळकर यांनी हाणला आहे.

शिवसेनेने मागील निवडणुकीत दिलेले घरपट्टी माफीचे आश्वासन आणि नुकताच त्याबाबत मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठाणेकरांच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी आणि पाण्याची वाढीव बिले याबाबत आमदार संजय केळकर यांनी काल ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेतली. त्यावेळी भाजपचे नगरसेवक नारायण पवार आणि हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे हे ही उपस्थित होते.

आयुक्तांशी झालेल्या चर्चेत करमाफी संदर्भात आणखी एक फसवा फसवी उघडकीस आल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना घेतलेला हा निर्णय म्हणजे ठाणेकरांना दिलेल्या या भूलथापाच आहेत. विशेष म्हणजे याबाबतचा ठरावही अद्याप झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. हा ठराव कधी तयार होणार, शासनाकडे कधी पाठवणार, त्याला मंजुरी कधी मिळणार? असे प्रश्न निर्माण झाले असून दुसऱ्या निवडणुकीत मतांसाठी शिवसेनेने पुन्हा एकदा त्याच आश्वासनाचे गाजर ठाणेकरांना दाखवल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.

… तोपर्यंत पाणी बिलेही पूर्वीप्रमाणेच द्या

ठाण्यात पाण्याचे दीड लाख ग्राहक असून अर्ध्याहून कमी ग्राहकांना पाण्याचे मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर देखील सदोष असल्याने अवाजवी बिले निघत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. हे मीटर बदलून नवीन निर्दोष मीटर बसवावेत, तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच पाणीपट्टी आकारण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. यास प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -