फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
दिवाळी… सर्वांना उत्साह, ताजेपणा, उल्हास आनंद आणि प्रेरणा देणारी ही दिवाळी जशी जोमात येते तशीच सुमधुर आठवणी ठेऊन निघून पण जाते. कोणत्याही सणावाराच्या, वाढदिवसाच्या निमित्ताने औपचारिकता दाखवून, गोड बोलून तेवढ्यापुरते एकमेकांना कुरवाळणे आणि वर्षभर परत त्याच व्यक्तीची निंदा-नालस्ती, लावालाव्या करणे यातच अनेक कुटुंबातील सदस्य स्वतःला धन्य मानतात. पण कुटुंबातील प्रत्येक सदस्य महत्त्वाचा आहे. कोणतंही नातं टिकविण्यासाठी आपल्याच लोकांपुढे नमतं घेण्यासाठी आपला अहंकार आडवा का यावा, यावर प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली दिवाळी साजरी झाली. त्यामुळे यंदा दिवाळी सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरी केली. त्यानिमित्ताने आपण सर्वजण हाच निग्रह करूयात की, आपल्या नातेसंबंधांमध्ये रोजच दिवाळी असेल, रोजच आपण आपलं जगणं साजरं करूयात, रोजच आपण भूतकाळ विसरून नव्याने पाडवा पहाट जगूयात… रोजच आपण घरच्या लक्ष्मीची पूजा करूयात, रोजच आपण बहीण-भावातील नाते सुदृढ करून भाऊबीज साजरी करूयात. दिवाळीत घरातील जळमट काढण्याबरोबरच आपल्या मनाला लागलेली जळमट, कलुषित झालेले नातेसंबंध देखील स्वच्छ करूयात.
मनामध्ये द्वेष, हेवादावा, अपमान, सदोदित आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आपल्याला सुखाने जगू देत नाही. कोणासाठी काय केलं, किती केलं तरी ते कमीच पडलं का? म्हणून रडत-कुढत बसून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगण्याची संधी गमावून बसतो. आपला हेतू, आपला विचार चांगला ठेऊन कृती केलेली असेल तर कुठे नाही, पण देवाच्या दारी त्याची नोंद नक्कीच होत असते. दुसऱ्याला नाव ठेवताना, दुसऱ्याच्या चुका काढताना आपण स्वतः जास्त चुकत असतो, इतरांची निंदा करताना आपण आपली मन:स्थिती बिघडवून घेत असतो. अनेक घरांमध्ये लक्ष्मीपूजन धुमधडाक्यात साजरे केले जाते; परंतु त्या घरची सून, त्या घरातील माता, त्या कुटुंबातील स्त्रीचा मात्र वर्षभर अपमान केलेला असतो. या दिवाळीपासून आपण घरातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान वर्षभर कसा टिकून राहील, यासाठी प्रयत्न करूयात.
आपल्या नात्यातील सर्व सदस्य, कुटुंबातील महिला, ज्येष्ठ, बालक हसतमुख राहणे, आनंदी राहणे, त्यांचे चेहरे सुखासमाधानाने उजळणे, त्यांच्यातील कटुता संपून त्यांचे चेहरे खुलवणे हीच खरी रोषणाई आपण नुकत्याच साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या निमित्ताने करूयात. दिवाळी सणाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
अाध्यात्मिक-ऐतिहासिक महत्त्वासोबतच दिवाळीचे सर्व दिवस जसे कायम एकमेकांना लागून, एकमेकांसोबत येतात, तसेच आपण आपल्या घरातल्या सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवायला शिकुयात. हे सर्व दिवस एकत्र येतात, म्हणूनच त्याला दिवाळी म्हणतात. म्हणूनच तो सर्वात मोठा सण समजतात आणि म्हणूनच या सणाचं महत्त्व कायम टिकून आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला जसं वेगवेगळे महत्त्व आहे, त्यामागे वेगवेगळी परंपरा आहे. तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला महत्त्व आहे. प्रत्येकाला दर्जा आहे, त्याचं स्थान आहे. तसेच जेव्हा सगळे कुटुंब एकत्र नांदताना दिसेल, तेव्हा त्याला देखील दिवाळीसारखं महत्त्व मिळेल.
दुर्दैवाने काही नातेसंबंध टिकविण्याच्या किंवा सुधारण्याच्या पलीकडे गेलेले असले तरी, त्यावर आयुष्यभर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आणि कुढत बसण्यापेक्षा ते नातं निभवायला आपण कुठे कमी पडलो, आपलं काय चुकलं, याचं आत्मपरीक्षण करून त्यातून शिका. निदान आपल्याकडून त्यावेळेस झालेली चूक किंवा निष्काळजीपणा परत होणार नाही, याची पूर्ण काळजी घ्या. सुदृढ आणि समृद्ध नातेसंबंधांचे तोरण घरोघरी लागण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात. आपल्या नात्यातला ओलावा आणि सुगंध आयुष्यभर टिकण्यासाठी आपण घरोघरी आत्मीयतेचे उटणे बनवायला सुरुवात करूयात. एकमेकांना शिव्याशाप, तळतळाट आणि दोष देण्यापेक्षा एकमेकांना येत्या दिवाळीपासून फक्त प्रेमाचे, आपुलकीने शब्द देऊयात. कुटुंबाची ताकद, नात्यांचा महिमा असाच वर्षानुवर्षे परंपरा म्हणून जोपासला जाईल, असा आदर्श आपण येणाऱ्या पिढीसमोर ठेवूयात. दिवाळीची परंपरा फक्त मौज, मजा, खरेदी, उधळपट्टी, हिंडणं- फिरणं यासाठी न जपता आपल्या हक्काच्या माणसांची साथ, सदिच्छा, सोबत आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी जपूयात. नैराश्य, एकटेपणा, एकाकीपणा, असुरक्षितता, अस्वस्थपणा या सर्व दुखण्यावर एकच रामबाण उपाय म्हणजे बोला, व्यक्त व्हा, एकमेकांच्या विचारांना किंमत द्या, प्रत्येकाचे अस्तित्व स्वीकारा, प्रत्येकाला आपली कमतरता जाणवेल, उणीव भासेल इतके मोठ्या मनाचे व्हा!