Wednesday, September 17, 2025

‘एसटी’चे तीन हजार संपकरी कर्मचारी होणार बडतर्फ

‘एसटी’चे तीन हजार संपकरी कर्मचारी होणार बडतर्फ

मुंबई (प्रतिनिधी) : भरघोस पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा ठाम निर्णय घेतल्याने अखेर महामंडळानेही कठोर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महामंडळात कायमस्वरूपी असलेल्या तीन हजार कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात येणार आहे.

दरम्यान, एसटीच्या फेऱ्या वेळापत्रकाप्रमाणे धावत्या ठेवण्यासाठी २००० प्रशिक्षणार्थींची महामंडळात नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणार्थींचे ९० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे अंतिम चाचणी घेऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबनाची नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर १५ दिवसांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडणे अपेक्षित होते. काही कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली, तर काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार पुढील कार्यवाही सुरू करावी लागणार आहे. पुढील कारवाई म्हणून महामंडळाकडून बडतर्फीची ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश एसटी मुख्यालयातून सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. बडतर्फीची नोटीस मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने ७ दिवसांत उत्तर देणे अपेक्षित असते. या सात दिवसांत उत्तर दिले अथवा नाही तरी महामंडळ आदेश काढून संबंधितांना सेवेतून कायमचे काढून टाकू शकते, असा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना धमकावू नये, अशा सूचना महामंडळाला केल्या होत्या. प्रत्यक्षात महामंडळ कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आणि सर्व बाजूंनी दबाव आणत आहे.

Comments
Add Comment