देवा पेरवी
पेण : ‘एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करा’, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आठ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सामील झालेल्या रायगड जिल्ह्यातील संपकरी कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी गुरुवार दुपारपासून टप्प्याटप्प्याने रुजू झाले आहेत. त्यामुळे गेल्या अठरा दिवसांपासून डेपोमध्येच ब्रेक लागून थांबलेली ‘लालपरी’ म्हणजेच एसटी पुन्हा एकदा पेणच्या रस्त्यावर धावू लागली आहे. आजच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील एसटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून प्रवाशांचे जे हाल झाले होते आणि अधिकचे पैसे खासगी वाहनांसाठी मोजावे लागत होते, त्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण आगारातून दुपारपासून पनवेल, नागोठणे, अलिबाग येथील गाड्या सोडून प्रवाशांना सुखकर प्रवास देण्यास महामंडळाने पुन्हा एसटी सेवा सुरू केली. जसे बस स्थानकात प्रवासी येतील व ते जेथे जात असतील त्या ठिकाणच्या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमधील विविध ठिकाणच्या बसेस सुरू झाल्या असल्याचे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले.